मुंबई : पती-पत्नी दीर्घकाळ विभक्त राहणे हेच मानसिक क्रौर्य आहे, असे निरीक्षण नोंदवून याचिकाकर्त्याला घटस्फोट नाकारणारा २०१९ मधील कौटुंबीक न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला.

याचिकाकर्ता पत्नीपासून मागील १२ वर्षांपासून विभक्त राहत आहे. या दाम्पत्याचा विवाह आता पूर्णपणे मोडल्यासारखा असून तो पूर्ववत होणे शक्य नाही. अशातच वर्षानुवर्षे पती-पत्नीमधील संबंध अधिक कटू आणि संघर्षपूर्ण झाले आहेत. विस्कळीत झालेल्या वैवाहिक नात्याचे केवळ बाह्य स्वरूप टिकवून ठेवणे म्हणजे दोघांवरही अन्याय करण्यासारखे आहे, असेही निरीक्षणही न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याची घटस्फोटाची मागणी मंजूर करताना नोंदवले.

मानखुर्दस्थित ३१ वर्षांच्या याचिकाकर्त्याचा २०१३ मध्ये २५ वर्षांच्या प्रतिवादीशी बौद्ध पद्धतीने विवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे सहा महिने दोघांचे संबंध छान होते. मात्र, त्यानंतर त्यांच्यातील मतभेद वाढत गेले. प्रतिवादीचा गर्भपात झाल्यानंतर त्यासाठी आपल्यालाच जबाबदार धरल्याचा दावा याचिकाकर्त्याने याचिकेत केला. सप्टेंबर २०१४ मध्ये प्रतिवादी याचिकाकर्त्याचे घर सोडून माहेरी निघून गेली आणि त्यानंतर ती परत आली नाही, असा दावा देखील याचिकाकर्त्याने केला होता.

”व्हॅलेंटाइन डे”ने वाद टोकाला

”व्हॅलेंटाइन डे”च्या दिवशी प्रतिवादीने तिचे दुसऱ्यावर प्रेम असल्याचे आपल्याला सांगितले. मात्र, त्यानंतर तिने या वक्तव्यावरून घूमजाव करून ते नाकारले. दाम्पत्यातील वाद मिटवण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, प्रतिवादीने दाखल केलेली अदखलपात्र (एनसी) तक्रार आणि नवी मुंबई पोलिसांच्या महिला व बालकांसाठीच्या विशेष कक्षात केलेली फौजदारी तक्रार यामुळे दोघांमधील तडजोडीचे प्रयत्न फसले.

विवाह दुरुस्तीपलीकडे

घटस्फोट नाकारण्याच्या कौटुंबीक न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या आदेशाला याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. प्रतिवादीच्या कथित विवाहबाह्य संबंधांबाबत दोन्ही बाजूंच्या दाव्यांमध्ये पूर्णपणे परस्परविरोधी भूमिका असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, दाम्पत्याचे वैवाहिक नाते आता दुरुस्तीपलीकडे गेले असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द केला. त्याचप्रमाणे, याचिकाकर्त्याला घटस्फोट मंजूर केला. याचिकाकर्त्याने क्रौर्य आणि परित्यागाची बाब सिद्ध केल्याचेही न्यायालयाने नमूद केले.