मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुंबईत लैंगिक अत्याचाराच्या, विशेषकरून अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटना अधिक संवेदनशीलतेने हाताळून तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्व पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. हेही वाचा >>> ‘पॉड टॅक्सी’च्या निविदेत हैदराबाद येथील कंपनीची बाजी याशिवाय बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) दाखल प्रत्येक गुन्ह्यात स्थानिक उपायुक्तांना पीडित व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सुरक्षेबाबत आश्वस्त करण्यास सांगण्यात आले आहे. परिणामी, मुंबईत पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या १२ दिवसांत मुंबईत पोक्सो कायद्याअंतर्गत सुमारे १२१ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ९८ टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक झाली आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत मुंबईत महिन्याला सरासरी ९० ते ९५ गुन्हे दाखल होत होते, पण बदलापूर प्रकरणानंतर अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणे अधिक संवेदनशीलतेने हाताळण्याचे आदेश मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.