scorecardresearch

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त; १९ लाख  शेतकऱ्यांकडून २०६३ कोटींचा भरणा

राज्यभरातील एकूण १९ लाख ५८ हजार ७३४ शेतकऱ्यांनी या कृषिपंप वीजबिल सवलत योजनेत भाग घेत २०६३ कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी भरली आहे.

१९ लाख  शेतकऱ्यांकडून २०६३ कोटींचा भरणा

मुंबई : कृषिपंपांच्या थकीत वीजबिलांच्या रकमेत ऊर्जा विभागाने दिलेल्या सुमारे ६६ टक्के सवलतीचा लाभ घेत ३ लाख ७५ हजार २५४ शेतकऱ्यांसह राज्यातील तब्बल १२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिल थकबाकीतून मुक्त झाले आहेत. तर राज्यभरातील एकूण १९ लाख ५८ हजार ७३४ शेतकऱ्यांनी या कृषिपंप वीजबिल सवलत योजनेत भाग घेत २०६३ कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी भरली आहे.

राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची महावितरणकडून सुरू असलेल्या अंमलबजावणीला शेतकरी प्रतिसाद देत असून ३१ मार्चपर्यंत चालू बिल व सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे. या योजनेत राज्यातील १२८० गावांतील सर्व ३ लाख ७५ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपाची वीजबिल थकबाकी भरल्याने ती गावे थकबाकीमुक्त झाली आहेत.

 कोकण प्रादेशिक विभागातील सर्वाधिक ११२२, पुण्यात ९३, नागपुरातील ६१ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील ४ अशा एकूण १२८० गावांमधील शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व ५० टक्के सुधारित थकबाकीचा भरणा करून १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या १२८० गावांतील ३ लाख ७५ हजार २५४ शेतकऱ्यांनी संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळविली आहे.

या शेतकऱ्यांनी चालू बिल व ५० टक्के सुधारित थकबाकीचे एकूण ७५४ कोटी ५८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यांना विलंब आकार, व्याज व उर्वरित ५० टक्के थकबाकीचे म्हणजे ५४४ कोटी ३२ कोटी रुपयांची अतिरिक्त सवलत मिळाली आहे. याचप्रकारे राज्यभरातील ३०,३९९ वितरण रोहित्रे कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त झाले आहेत. या रोहित्रांवरून वीजजोडणी घेतलेल्या ४३ हजार ७७५ शेतकऱ्यांनी ३८ कोटी २९ लाख रुपयांचा भरणा करून कृषिपंपांचे वीजबिल कोरे केले आहे. यात कोकणातील १० हजार ४४, पुण्यातील ८ हजार २३०, नागपुरातील ८ हजार ३९३ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील ३ हजार ७३२ रोहित्रांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एकूण १९ लाख ५८ हजार ७३४ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग घेत २०६३ कोटी ४३ लाख रुपयांची रक्कम भरली.

 या शेतकऱ्यांची एकूण ६१०० कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आली आहे. कृषिपंपांच्या वीजबिलांबाबत तक्रारी किंवा शंका असल्यास त्याचे  निराकरण करण्याचे आदेश मुख्यालयातून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यभरातून प्राप्त झालेल्या कृषिपंपाच्या बिलांबाबत १ लाख ५९ हजार ३४७ पैकी १ लाख ५० हजार ४२१ (९४.४ टक्के) तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात आले आहे.

 तसेच वीजबिल दुरुस्तीचे सुमारे २७३ कोटींची रक्कम संबंधीत शेतकऱ्यांच्या वीजबिलामध्ये वळते करण्यात आले आहेत. येत्या मार्चपर्यंत सध्याच्या सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम व चालू बिल भरून शेतकऱ्यांनी कृषिपंपाचे वीजबिल थकबाकीमुक्त करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 1280 villages free from arrears from electricity bills of agricultural pumps akp

ताज्या बातम्या