मोदी सरकारने अभियांत्रिकी अभ्यासक्रम मातृभाषेत करण्याची घोषणा केली, त्यानंतर आता मराठीमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या पुस्तकांचं विमोचनही होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि विशेष करून माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले, “ मराठी भाषा आणि मराठी माणूस याच्या नावाने गळे काढायचे, ते गळेखोर आता कुठे लपले आहेत? कारण, मोदी सरकारने केवळ घोषित नाही केलं, तर प्रत्यक्षात आता करून दाखवलं आहे. की अभियांत्रिकी अभ्यासक्रम हा आपल्या मातृभाषेत करण्याची घोषणा केली आणि आता तर आज मराठीमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या पुस्तकांचं विमोचन होत आहे. महराष्ट्रातील गावाखेड्यातील जवळपास डिप्लोमामधील ३७ टक्के विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचं ठरवलं आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात त्याला प्रतिसाद मिळतोय, जे ठरवलं जे सांगितलं ते केलं. मग आज मोदी सरकारने मराठीमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या पुस्तकाचं विमोचन केलय हे गळेखोर एकही स्वागताचा शब्द काढत नाहीत.”

याशिवाय “ यामधील काही लोक तर असे आहेत, की ज्यांना झोपेतून जरी उठवलं तरी त्या प्रसिद्ध सिनेमामधील जे वाक्य आहे, कधी उठवलं की ‘बाबा लगीन…’ तसं कधीही काही झालं तरी महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, मराठी झुकणार नाही. हे बोलणारे आता का गळा काढत नाहीत. त्यामुळे यांचं मराठी वरचं प्रेम हे बेगडी आहे. ते शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) असो किंवा राष्ट्रवादी, काँग्रेसचा तर प्रश्नच नाही.” असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

याचबरोबर “ आदित्य ठाकरेंना तर आमचा थेट सवाल आहे, तुम्ही मराठी शिक्षण आणि मराठी भाषा यावर राजकारण करतात. मुंबईत तुम्ही मराठी शाळा बंद पाडल्या. १ लाख विद्यार्थी मराठी शाळेत जायचे ते आज ३५ हजारांवर आले आहेत. त्यामुळे एका बाजूला मराठी शिक्षणाची गैरसोय करणारे आदित्य ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला अभियांत्रिकी ज्ञानालाही मराठीत पुस्तकं देणारं मोदी सरकार. भाजपा मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी काम करते आहे, हा याचा स्पष्ट पुरावा आहे.” असं म्हणत त्यांनी यावेळी माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकाही केली.

आशिष शेलार ट्वीटद्वारे काय म्हणाले? –

“पेंग्विन सेनेच्या ‘आदित्य’ कारभारामुळे गेल्या १० वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३० मराठी शाळांना टाळे लागले, तर विद्यार्थी संख्या १ लाखावरून ३५ हजारांवर आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यात उच्च व तंत्रशिक्षण आता मराठीतून मिळणार.वा रे वा! मराठी शाळा बंद करुन पब्लिक स्कूल? मराठीचे तथाकथित रक्षणर्त्यांचे मराठी प्रेम म्हणजे थंडा थंडा कूल कूल! किंवा यांचे मराठीवरचे प्रेम म्हणजे इंग्रजीच्या फेसात नुसतेच हाऊसफुल्ल!”

“मातृभाषेतून उच्च शिक्षण झाले पाहिजे असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी करा. अशी पहिली मागणी आम्ही ८ फेब्रुवारी २०२१ रोजी केली होती. माय मराठीच्या महाराष्ट्रात आज खऱ्या अर्थाने त्याला मुर्त स्वरुप येतेय!एक आनंदाचा क्षण…”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 130 marathi schools of mumbai municipal corporation closed in 10 years due to peguin senas aditya administration ashish shelar msr
First published on: 14-11-2022 at 10:30 IST