रुग्णसंख्येत चौपटीहून अधिक वाढ; ऑगस्टमध्ये १३२ रुग्ण

मुंबई :  करोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: डेंग्यूची साथ पसरत चालली असून तापाने मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत जुलैच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जवळपास चौपटीने वाढली आहे.

शहरात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. अधूनमधून येणाऱ्या या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी डासांची पैदास वाढली असून त्यामुळे गेल्या महिनाभरात डेंग्यूचा प्रसार मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. जुलैमध्ये डेंग्यूचे २८ रुग्ण होते.

ऑगस्टच्या आकडेवारीनुसार ही संख्या आता १३२ वर गेली आहे. जानेवारी ते ऑगस्ट डेंग्यूच्या एकूण रुग्णांची संख्या २०९ झाली आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण १२९ होते. परंतु २०१९ च्या तुलनेत मात्र कमी आहे. हिवतापाच्या रुग्णांची संख्याही किंचित वाढली असून ऑगस्टमध्ये ७९० रुग्ण आढळले आहेत.

अन्य पावसाळी आजारांचे प्रमाण कमी

ऑगस्टमध्ये पावसाचा जोर फारसा नसल्यामुळे पाणी साचण्याच्या घटनाही फारशा घडल्या नाहीत. परिणामी लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. परंतु ऑगस्टमध्ये लेप्टोचे ३७ रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूचा प्रसार तुलनेने अजून कमी असून शहरात जुलैच्या तुलनेत कमी रुग्ण आढळले आहेत. कावीळ आणि अतिसाराचे प्रमाणही जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कमी असल्याचे दिसून आले आहे.

भीतीपोटी रुग्ण लवकर उपचारासाठी दाखल

डेंग्यूच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत नक्कीच वाढली आहे. या रुग्णांमध्ये सर्वसाधारणपणे ताप, अंगावर पुरळ येणे हीच लक्षणे दिसून येत आहेत. तसेच रुग्ण करोनाच्या भीतीने का होईना ताप आला की लगेचच रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे अन्य आजारांचे निदान वेळेत केले जाते. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले असले तरी वेळेत उपचार दिले जात असल्यामुळे गंभीर प्रकृती होण्याचे प्रमाण तुलनेने फारच कमी आहे, असे कूपर रुग्णालयाच्या औषधशास्त्र  विभागाच्या प्रमुख डॉ. नीलम रेडकर यांनी सांगितले.

सर्वाधिक रुग्ण डोंगरी, परळ, वांद्रय़ात

डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण डोंगरी(बी), परळ(एफ साऊथ) आणि वांद्रे पश्चिम(एच पश्चिम) या भागांत आढळले आहेत. कीटकनाशक विभागाने १३ लाख १५ हजार ३७३ घरांची पाहणी केली असून ११ हजार ४९२ डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत.

नागरिकांना पालिकेचे आवाहन

ऑगस्ट, सप्टेंबर हा डेंग्यूच्या साथीचा काळ असल्यामुळे डासांची पैदास वाढणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी. मच्छरांपासून रक्षण करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. तसेच घराजवळील परिसर स्वच्छ ठेवून पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच ताप, अंगावर पुरळ उठणे, डोकेदुखी, सांधेदुखी अशी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

पावसाळी आजारांची स्थिती

आजार             जुलै    ऑगस्ट

मलेरिया            ७८७    ७९०

लेप्टो               ३७       ३७

डेंग्यू                २८     १३२

गॅस्ट्रो              २९४    २७६

हिपेटायटिस     ४८     ३५

स्वाईन फ्लू     २१     १७