मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. राऊत यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीची मुदत संपुष्टात आली. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या वेळी त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. या घोटाळय़ाप्रकरणी ४ ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. त्या वेळी त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ नुसार राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे राऊत यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. न्यायालयीन सुनावणीच्या वेळी राऊत यांच्या वकिलाने ईडीच्या कोठडीप्रमाणेच न्यायालयीन कोठडीतही त्यांना घरचे जेवण, औषधे घेण्याची परवानगी आणि हवेशीर खोली मिळावी अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने याबाबत आर्थर रोड तुरुंग प्रशासनाशी बोलण्यास सांगितल्याचे समजते.

खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कोणत्या बॅरेकमध्ये ठेवण्यात येणार याची माहिती देण्यास तुरुंग अधिकाऱ्यांनी नकार दिला. राऊत यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. मात्र त्यांना आमदार नवाब मलिक किंवा अनिल देशमुख यांच्याबरोबर ठेवण्यात येणार नाही.