लहरी हवामानाचा फटका बसलेल्या मुंबईची हवा दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा एकदा थंड झाली. रविवारी सांताक्रूझ येथे १४.४ अंश से. किमान तापमान नोंदले गेले. मध्य महाराष्ट्रात मात्र थंडीची लाट असून नांदेड येथे तापमान सलग दुसऱ्या दिवशी ४.५ अंश सेल्सियस नोंदले गेले. कोकण व विदर्भातील किमान तापमानही सरासरीच्या तुलनेत कमी राहिले. मुंबईतील तापमान १५ ते १६ अंशांदरम्यान राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला.
राज्यात उबदार वातावरण असताना २२ ते २४ डिसेंबरदरम्यान मुंबई थंडगार पडली होती.
मुंबईची थंडी तीनच दिवस टिकली आणि राज्यात थंडी येत असताना मुंबई उबदार झाली. २५ डिसेंबर रोजी किमान तापमानात तब्बल सात अंश से.ची भर पडली. मात्र आता शहरातही पुन्हा थंड वातावरण होत असून रविवारी त्याचीच झलक दिसली. सांताक्रूझ येथे १४.४ तर कुलाबा येथे २०.३ अंश सेल्सियस किमान तापमान राहिले.
मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आहे. सलग दुसऱ्या दिवशी नांदेडचे तापमान ५ अंश से.खाली गेले होते. पुण्यात ६.८ अंश से. तापमान होते.

राज्य तापमान (अंश से.)
नांदेड – ४.५
पुणे – ६.८
नाशिक – ८.२
नागपूर – १०.१
रत्नागिरी – १८.७

किमान तापमानातील चढउतार (अंश से.)
२२ डिसें. – १३.४
२३ डिसें. – ११.६
२४ डिसें. – ११.४
२५ डिसें. – १८.३
२६ डिसे. – १६.६
२७ डिसें. – १४.४