उभारणीकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी अडचणीत

मुंबईतील अनधिकृत गणेश मंडपांच्या यादीत अंधेरी-जोगेश्वरी परिसर आघाडीवर असून या विभागात सर्वाधिक म्हणजे १४ अनधिकृत मंडप आहेत. कमला मिल अग्निकांडानंतर तडकाफडकी बदली करण्यात आलेल्या साहाय्यक आयुक्तांच्या हाती या परिसराची सूत्रे आहेत. मुंबईत अनधिकृतपणे उभारलेल्या ४४ मंडपांना पालिकेकडून परवानगी देण्यात आल्याबद्दल १३ साहाय्यक आयुक्तांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने कारवाईच्या भीतीने या १३ अधिकाऱ्यांच्या छातीत धडकी भरली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने तहसीलदार, पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकांची नियुक्ती केली. या पथकात सहभागी तहसीलदार आणि पालिका अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी फिरून गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभारलेल्या मंडपांची पाहणी केली. या पाहणीच्या दुसऱ्या टप्प्यात ४४ मंडप अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. असे असतानाही पालिका अधिकाऱ्यांनी या मंडपांना परवानगी दिल्याची कबुली खुद्द पालिकेनेच उच्च न्यायालयात दिली आहे. मुंबईतील या ४४ अनधिकृत मंडपांना परवानगी देणाऱ्या १३ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही पालिकेने न्यायालयात सांगितले आहे.

ठिकठिकाणच्या या ४४ बेकायदा मंडपांना परवानगी दिल्याचा ठपका अलका ससाणे, प्रशांत सपकाळे, प्रशांत गायकवाड, चंदा जाधव, संजोग कबरे, रमाकांत बिरादर, संध्या नांदेडकर, अजितकुमार अंबी, श्रीनिवास किलजे, संभाजी घाग, भाग्यश्री कापसे, संतोषकुमार धोंडे, किशोर गांधी या १३ साहाय्यक आयुक्तांवर ठेवण्यात आला आहे. मुंबईतील ४४ पैकी तब्बल १४ अनधिकृत मंडप पालिकेच्या ‘के-पूर्व’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत म्हणजेच अंधेरी-जोगेश्वरी परिसरात असून बेकायदेशीर मंडपांच्या यादीत ‘के-पूर्व’ विभाग कार्यालयाचा क्रमांक आघाडीवर आहे. त्याखालोखाल अनधिकृत मंडपांना परवानगी देणाऱ्या विभाग कार्यालयांच्या यादीमध्ये ‘एस’ (भांडुप-पूर्व) विभाग कार्यालयाचा क्रमांक लागला असून या विभाग कार्यालयाच्या हद्दीत पाच अनधिकृत मंडप आढळून आले आहेत. ‘के-पश्चिम’ विभागाच्या हद्दीतील अंधेरी, विलेपार्ले परिसरात, तसेच ‘एल’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कुर्ला परिसरात प्रत्येकी चार मंडळांनी अनधिकृतपणे मंडप उभारल्याचे निदर्शनास आले आहेत. ‘पी-उत्तर’ (मालाड), आर-मध्य (बोरिवली), एम-पश्चिम (गोवंडी, मानखुर्द) विभाग कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येकी तीन, आर-उत्तर (दहिसर), एम-पूर्व (चेंबूर) प्रत्येकी दोन, ‘एच-पूर्व’ (सांताक्रूझ), ‘पी-दक्षिण’ (गोरेगाव), ‘एन’ (घाटकोपर), ‘टी’ (मुलुंड) विभाग कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येकी एक अनधिकृत मंडप असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते.

ही बाब पथकाने पालिका अधिकाऱ्यांच्या कानावर घातली होती. असे असतानाही या सर्व विभाग कार्यालयांनी ४४ मंडळांच्या मंडपांना परवानगी दिली.