ऑनलाइन गेम खेळताना गच्चीवरून उडी मारल्याचा संशय

अंधेरी पूर्वेकडील ‘शेर ए पंजाब’ वसाहतीतल्या इमारतीवरून उडी घेत मनप्रीत सिंग (१४) या विद्यार्थ्यांने शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आत्महत्या केली. वादग्रस्त ‘ब्ल्यू व्हेल’ ही ऑनलाइन गेम खेळताना मनप्रीतने आत्महत्या केली असावी, असा  मेघवाडी पोलिसांचा अंदाज आहे.

मनप्रीत पालकांसह शेर ए पंजाब वसाहतीतल्या ‘एम्पायर’ रेसिडेन्सी इमारतीत राहतो. या सातमजली इमारतीच्या गच्चीवरून त्याने उडी घेतली. मनप्रीत गच्चीच्या कठडय़ावर उभा राहून खाली उडी मारण्याच्या बेतात आहे हे समोरच्या इमारतीतल्या एका व्यक्तीने पाहिले होते. या व्यक्तीने आपल्या घरातूनच आरोळी ठोकून मनप्रीतला परावृत्त करण्याचा प्रयत्नही केला होता, असे समजते. मेघवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी व तपास सुरू आहे. आत्महत्येपूर्वी मनप्रीतने एका मित्राला कळवले होते. त्याने लघुसंदेश केला की समाजमाध्यमांवर आत्महत्या करीत असल्याचे जाहीर केले ही बाब तपासून पाहिली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

‘ब्लू व्हेल’ हा ऑनलाइन खेळ रशियात तयार करण्यात आला आहे. या खेळात टप्पे असतात. एक लक्ष्य पूर्ण केले की पुढल्या टप्प्याचा खेळ सुरू होतो. अखेरचे लक्ष्य आत्महत्येचे आहे. जगभरात अनेकांनी या खेळात जीव गमावला आहे.