मुंबई: डॉक्टर होणे ही पदवी असली तरी डॉक्टर म्हणून समाजाचा विश्वास संपादन करणे ही खरी कमाई आहे. प्रत्येक रुग्ण वेदना आणि चिंता घेऊन रुग्णालयात येतो. उपचारानंतर तो समाधानाने आणि विश्वासाने चालत घरी परतणे, हेच डॉक्टरांच्या सेवेचे यश आहे. त्यामुळे नव्याने रुजू झालेल्या डॉक्टरांनी समर्पण, सेवाभाव, रुग्णसंवाद आणि संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १४४० नवनियुक्त वैद्यकिय अधिकारी यांना नियुक्तीपत्रे वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. या डॉक्टरांमध्ये सुमारे ७०० महिला डॉक्टरांचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य सेवेत एकाच वेळी १ हजार ४४० एमबीबीएस डॉक्टर दाखल झाल्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे. आणखी ६२१ डॉक्टरांची भरती करण्यात येणार असून, प्रशासकीय ‘फाईल’ तयार होण्यापूर्वी गरजू रुग्णाला उपचार मिळाला पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टरांची पुरेशी उपलब्धता आवश्यक आहे. त्याचबरोबर डॉक्टरांना चांगले निवासस्थान, स्वच्छ व सुरक्षित परिसर, विरंगुळा आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. डॉक्टरांवर रुग्णसेवेचा मोठा ताण असतो. त्यामुळे त्यांच्या कामासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
प्रत्येक आरोग्य संस्थेत डॉक्टर उपलब्ध करण्याचा निर्धार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
राज्यातील एकही प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय डॉक्टरविना राहू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने १ हजार ४०० डॉक्टरांची भरती केली आहे. नवनियुक्त डॉक्टरांनी पारदर्शकपणे काम करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. सुमारे १० हजार उमेदवारांमधून या डॉक्टरांची निवड झाली आहे. पुढील टप्प्यात आणखी ६०० डॉक्टरांची भरती प्रक्रिया, १ हजार ९०० समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना राज्यातील उपकेंद्रांमध्ये नियुक्ती, तसेच ३५० नवीन ‘१०८’ रुग्णवाहिकांचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५ हजार कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी १२ डॉक्टरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिण्दे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तिपत्रे देण्यात आली. यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर,प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी मनोगत व्यक्त केले.
