मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) १४७६ कोटी रुपयांच्या अमली पदार्थ तस्करीप्रकरणी केरळ येथील एका फळ आयात कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला रविवारी रात्री अटक केली. याप्रकरणी आरोपीने दक्षिण आफ्रिकेतून संत्र्यांची आयात करत असल्याचे दाखवून त्याच्या आडून १९८ किलो मेथॅम्फेटामाइन आणि ९ किलो कोकेन आणले होते. चौकशीत दक्षिण आफ्रिकेतील फळ निर्यात कंपनीचा मालक अमली पदार्थाचा प्रमुख पुरवठादार असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डीआरआयने ३० सप्टेंबरला मेथॅम्फेटामाइनबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करून १४७६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. एक संशयित ट्रक डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी वाशी येथे अडवला. कसून तपासणी केल्यावर संत्री असलेल्या ३२० हिरव्या आणि लाल रंगाच्या खोक्यामध्ये अमली पदार्थ लपवले असल्याचे आढळले. त्यानंतर ते जप्त करण्यात आले होते.

दक्षिण आफ्रिका, ब्राझील, तुर्की आणि इतर देशांतून फळे आयात करणाऱ्या केरळस्थित युम्मिट्टो इंटरनॅशनल फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने संबंधित संत्री आयात केली होती. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विगिन वर्गीस यांना दोन दिवसांच्या चौकशीनंतर रविवारी रात्री अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीमुळे डीआरआयला मूळचा केरळातील रहिवासी असलेला मन्सूर थचापरंबन याचा याप्रकरणी सहभाग आढळला. मन्सूर हा सध्या दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे असून तो मोर फ्रेश एक्सपोर्ट्स प्रायव्हेट नावाच्या कंपनीचा मालक आहे. करोनाकाळात मुखपट्टीची आयात करून असताना वर्गीस हा मन्सूरच्या संपर्कात आला. करोनाकाळात मन्सूरने कमी किमतीत संत्री पाठवल्यामुळे वर्गीसला व्यवसायात चांगला नफा झाला. वर्गीसला ७० टक्के, तर मन्सूरला ३० टक्के नफा मिळायचा. त्यानंतर मन्सूरने वर्गीसला दूरध्वनी करून संत्र्यांची मोठी खेप येणार असल्याचे सांगितले. ते राहुल नावाच्या व्यक्तीला देण्यात सांगण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीचा सहभाग असल्याचा डीआरआयला संशय आहे.

विमानतळावरून कोकेन जप्त

मुंबई सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाच्या (एआययू) अधिकाऱ्यांनी सुमारे ९८० ग्रॅम कोकेनच्या तस्करीप्रकरणी परदेशी महिलेला अटक केली. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत १० कोटी रुपये आहे. म्वान्जे फरिदा (३९) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ ऑक्टोबरला फरिदाला संशयाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून पांढऱ्या रंगाच्या भुकटी सापडली. ते कोकेन असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. वजन केले असता त्यात ९८० ग्रॅम कोकेन असल्याचे आढळून आले. तिला ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर कोकेन जप्त करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1476 crore drug case connection with south africa zws
First published on: 04-10-2022 at 06:24 IST