scorecardresearch

मुंबईतील १५ टक्के पाणीकपात रद्द

भातसा धरणातील विद्युत बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नसला तरी पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात पालिकेला यश आले आहे

मुंबई : भातसा धरणातील विद्युत बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नसला तरी पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात पालिकेला यश आले आहे. भातसा धरणातून दोन हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा मिळू लागला असल्यामुळे मुंबईकरांवरील १५ टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत २७ फेब्रुवारीला झालेला बिघाड दुरुस्त होण्यास आणखी किमान पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील १५ टक्के पाणी कपात अजून काही दिवस सुरू राहण्याची शक्यता होती. ही दुरुस्ती अद्याप झालेली नसली तरी मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भातसा धरणातून दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बिघाड दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यासाठी वेगवेगळे पर्याय जल अभियंता विभाग तपासून पाहत होता. मात्र भातसा धरणातूनच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्यामुळे पाणी कपातीचे संकट टळले आहे. दरम्यान, विद्युत केंद्रातील बिघाडाची दुरुस्ती करण्यात तांत्रिक अडचणी येत असून दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवू नये, असे आवाहन पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने केले आहे. 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 15 percent water cut in mumbai canceled zws

ताज्या बातम्या