मुंबई : जाड्या चिडवल्यामुळे संतप्त झालेल्या मुलाने १५ वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार मुंबईत घडला. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलीस अधिक तपास करीत आहेत.तक्रारदार मुलाने त्याच्याच परिसरात राहणाऱ्या ओळखीच्या १५ वर्षांच्या मुलाला जाड्या म्हणून हाक मारली.

तक्रारदार मुलगा गुरूवारी रात्री ॲन्टॉप हिल येथील सेक्टर ७ परिसरातील गार्डनमध्ये उभा असताना आरोपी व त्याचा साथीदार तेथे आले. त्यांनी मला जाड्या का म्हटले, असा जाब विचारून वाद घालण्यास सुरूवात केली. शिवीगाळ केल्यानंतर आरोपीसोबत आलेल्या साथीदाराने तक्रारदार मुलाचे मागून हात धरले आणि आरोपीने कंबरेला खोचलेला चाकू बाहेर काढून त्याच्यावर वार केले.

छातीवर झालेल्या गंभीर जखमांमुळे तक्रारदार मुलगा खाली कोसळला. त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी जखमी मुलाचा शुक्रवारी जबाब नोंदवला. त्याने त्याच्याच पसिररात राहणाऱ्या १५ व १६ वर्षांच्या दोन मुलांनी आपल्यावर हल्ला केल्याचे सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही अल्पवयीन मुलांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी १५ वर्षांचा हल्ला करणारा मुलगा व त्याच्या साथीदाराविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader