मुंबई : राज्यातील पाणथळ जमिनींचे संरक्षण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या, राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा सिडकोला विसर पडला आहे. पाणथळ जागांचे संरक्षण करण्याऐवजी त्या नष्ट होऊ लागल्या आहेत. सिडकोकडून आतापर्यंत उरणमधील तब्बल १५०० एकर जमीन नष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप ‘वनशक्ती’ या पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने केला आहे. याप्रकरणी वनशक्तीने कोकण विभागीय आयुक्त, वन विभाग आदींकडे तक्रार दाखल केली आहे.

पर्यावरण संरक्षणाच्यादृष्टीने पाणथळ जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पण राज्यातील पाणथळ जागांचे संरक्षण होत नसल्याने त्या जमिनींच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादापर्यंत वनशक्तीने धाव घेतली. २०१३ मध्ये दाखल करण्यात आलेल्या यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि हरित लवादानेही पाणथळ जागांचे संरक्षण करण्याचे आदेश सर्व संबंधित सरकारी यंत्रणांना दिले. त्यानुसार सर्व यंत्रणांनी आपापल्या अखत्यारीतील पाणथळ जागांचे संरक्षण करणे आवश्यक होते. सिडकोकडून या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. उरणमधील १५०० एकर पाणथळ जागा सिडकोच्या दुर्लक्षामुळे नष्ट झाल्याचाही आरोप त्यांनी केला. 

उरणमध्ये पणजे, बेलपाडा, भेंडकल, टीएस चाणक्य, एनआरआय कॉम्प्लेक्स, भांडुप पंपिंग स्टेशन, भोकडवीरा, सावकार आणि जासई अशा पाणथळ जागा आहेत. यापैकी भेंडकल, भोकडवीरा, जासई आणि सावरखार पाणथळ जागा गेल्या दोन वर्षांत पूर्णत: नष्ट झाल्या आहेत. पणजे येथील पाणथळ जागा वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींकडून प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित पाणथळ जागाही आता नष्ट होण्याच्या मार्गावर असून सिडको याकडे काणाडोळा करीत असल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. पाणथळ जागा रहिल्याच नाही तर त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी खंत व्यक्त करीत वनशक्तीने याविरोधात संबंधित विविध सरकारी विभागाच्या प्रमुखांकडे लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणी लवकरच अवमान याचिकाही दाखल करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित जागा वाचविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

प्रकरण तपासून पाहण्याची गरज

याविषयी सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण नेमके काय आहे ते तपासून पाहण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.