एसटीच्या मार्गावर १५ हजार खासगी वाहने

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी २९ ऑक्टोबरपासून राज्यातील काही आगारांमध्ये संप सुरू केला.

मुंबई:  एसटीच्या मार्गावर खासगी बस, शालेय बस तसेच अन्य खासगी वाहने चालवण्याची मुभा शासनाकडून देण्यात आली. सुरुवातीला कमी प्रमाणात धावत असलेल्या या खासगी सेवांमध्ये वाढ होऊ लागली असून राज्यात १५ हजार ४६२ खासगी वाहने एसटीच्या मार्गावर धावत असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी २९ ऑक्टोबरपासून राज्यातील काही आगारांमध्ये संप सुरू केला. २५० आगारांपैकी फक्त राज्यातील २५ ते ३० आगारांमध्येच संप सुरू होता. त्यामुळे  ७० ते ८० टक्के एसटी सेवा सुरूच होती, परंतु हा संप अधिक तीव्र झाला आणि एसटी सेवा ठप्पच झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप मिटेपर्यंत खासगी प्रवासी बस, शालेय बस, कंपनीच्या मालकीच्या बस आणि मालवाहू वाहने चालवण्याची परवानगी राज्य शासनाने दिली.

मुंबईत एसटीचे तीनही आगार सध्या बंदच ठेवले आहेत. त्यामुळे आगारातून किंवा त्याच्या बाहेरून एसटी सुटत नाहीत, परंतु अन्य ठिकाणाहून एसटीच्या मार्गावर खासगी वाहनांना एसटीचे प्रवासी घेऊन जाण्याची मुभा असल्याने मुंबईतून ४ हजार ११४ वाहने धावत आहेत.

* एसटीच्या ताफ्यात २०२०-२१ मध्ये १७ हजार ७१६ बसगाडय़ा होत्या. संपाच्या आधी दररोज १० ते १२ हजार एसटी धावत होत्या, तर २५ लाखांपर्यंत प्रवासी होते.

* महामंडळाला १३ ते १५ कोटी रुपये उत्पन्नही मिळू लागले, परंतु या उत्पन्नावर आता पाणी सोडावे लागले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 15000 private vehicles on st buses route zws

ताज्या बातम्या