माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेले अर्ज तातडीने निकाली काढणे अपेक्षित असतानाही महानगरपालिकेकडे पडून असलेल्या अर्जाची संख्या १५ हजारावर पोहोचली आहे. प्रलंबित अपिलांची संख्याही ९४५ वर पोहोचली आहे. याबाबत राज्य माहिती आयुक्तांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतल्यावर पालिकेने आठवडय़ाभरात हे अर्ज निकाली काढण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
सामान्य नागरिकांच्या हाती माहिती अधिकाराचे अस्त्र आल्यावर विविध विभागातील माहिती मिळवण्यासाठी पालिकेकडे अर्जाचा पाऊस सुरू झाला. संबंधित अर्जदाराला ३० दिवसात माहिती मिळण्याचे बंधन माहिती अधिकारात घातले गेले असले तरी ‘ही माहिती या विभागात उपलब्ध नाही,’ असे साचेबंद उत्तर पाठवून अनेक अर्ज पुढे ढकलले जातात. त्यामुळे अनेक अर्जदारांना वर्षभर  पाठपुरावा करूनही अपेक्षित माहिती हाती लागत नाही. माहिती अधिकाऱ्यांकडे याबाबत अपिल केल्यावरही अनेक अर्जदारांना माहितीची वाट पाहावी लागत आहे. ऑगस्टअखेरपर्यंत माहिती मागवलेल्या अर्जाची संख्या तब्बल १४,५४६ वर पोहोचली होती. अपिलीय अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही ९४५ अपील पालिकेकडे प्रलंबित आहेत. याबाबत राज्याचे माहिती आयुक्त अजितकुमार जैन यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेतली. या बैठकीत हे सर्व अर्ज विशेष मोहीम घेऊन निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या काळात संबंधित अर्जदारांनी मागितलेली माहिती देऊन अर्ज निकालात काढले जातील. जनमाहिती अधिकार २००५ अंतर्गत अर्ज केलेल्याला अर्जदाराला प्रत्यक्षात बोलावले जाणार असून आवश्यक असल्यास कागदपत्रांचे निरीक्षण करण्याची परवानगी दिली जाईल.