मुंबई : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. अपघात झाला वा इतर कोणतीही दुर्घटना घडल्यास तातडीने हवाई रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमींना तात्काळ योग्य उपचार मिळावेत यासाठी समृद्धी महामार्गावर १६ हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. यासंबंधीच्या निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून लवकरच या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गामुळे नागपूर – भरवीरदरम्यानचा प्रवास सहा तासांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. मात्र समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाहनचालक वेगमर्यादा पाळत नसल्याने, तसेच महामार्ग संमोहनामुळे सर्वाधिक अपघात होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गारील दिवसेंदिवस होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. अपघात रोखण्यासाठी कृती आराखडय़ाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. मुळात या महामार्गावरील अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी महामार्गालगत प्रत्येक ३० किमी अंतरावर हॅलिपॅड उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर महामार्गालगतच्या १६ विविध सेवा-सुविधांच्या योजनेत (फूड प्लाझा, पेट्रोल पंप आणि इतर सुविधा) या हेलिपॅडला समावेश आहे. त्यानुसार महामार्गालगत १६ हेलिपॅड बांधण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

महामार्गालगत १६ ठिकाणी विविध सेवा पुरविण्यासाठी एकत्रित निविदा मागविण्यात आली आहे. प्रतिसाद न मिळाल्याने या निविदेला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर एक निविदा सादर झाली असून या निविदेची छाननी सुरू आहे. लवकरच निविदा अंतिम करण्यात येणार आहे. या १६ ठिकाणच्या सेवा-सुविधांमध्ये हेलिपॅडचाही समावेश आहे. लवकरच या सेवा-सुविधांचा विकास करण्यात येणार आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

एकूण २२ हेलिपॅडचा प्रस्ताव

  • समृद्धी महामार्गालगत सध्या १६ हेलिपॅड प्रस्तावित आहेत. मात्र भविष्यात त्यांची संख्या वाढविण्यात येईल आणि एकूण २२ हेलिपॅड उपलब्ध होतील.
  • समृद्धी महामार्गालगत हेलिपॅड उभारल्यामुळे   दुर्घटना घडल्यास जखमींना हवाई रुग्णवाहिकेने तात्काळ रुग्णालयात दाखल शक्य होणार आहे. त्यामुळे जखमींना तात्काळ योग्य उपचार मिळतील.