धक्कादायक! अभ्यासासाठी घरात कोंडल्यामुळे दादरमधील मुलीचा होरपळून मृत्यू?

‘ही आग लावण्यात आली की अपघाताने लागली, अशा दोन्ही शक्यता आम्ही तपासून पहात आहोत’

मुंबईतील दादर पोलीस (सैतान चौकी) वसाहतीला रविवारी लागलेल्या भीषण आगीत एका 16 वर्षीय मुलीचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. श्रावणी चव्हाण असं त्या मृत मुलीचं नाव. मात्र, या घटनेबाबत एक धक्कादायक पैलू समोर आला असून त्या अंगानेही पोलीस तपास करत आहेत. लग्नसमारंभासाठी बाहेर जाताना आई-वडिलांनी श्रावणीनं अभ्यास करावा म्हणून घराचा दरवाजा बाहेरून बंद करून ठेवला होता, त्यामुळे आगीत होरपळून तिचा मृत्यू झाला अशी माहिती दादर पोलिसांनी दिली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एका लग्नसमारंभासाठी जाण्यासाठी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास श्रावणीचे आई-वडील निघाले. आपण गेल्यानंतर श्रावणीने घराबाहेर पडू नये, तिने केवळ अभ्यास करावा आणि तिच्या अभ्यासामध्ये अडथळा येऊ नये यासाठी तिच्या पालकांनी घर लॉक केलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आई-वडील घराबाहेर पडल्यानंतर काही वेळातच त्यांच्या घरातून धूर येताना शेजाऱ्यांना दिसला, दरवाजा तोडून आतमध्ये गेल्यावर जळालेल्या अवस्थेतील श्रावणीचा मृतदेह आढळला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना तिच्या घरामध्ये रॉकेलने भरलेली एक प्लॅस्टिकची बाटलीदेखील मिळाली आहे. आगीचं नेमकं कारण काय याबाबत तपास सुरू आहे. ही आग लावण्यात आली की अपघाताने लागली, अशा दोन्ही शक्यता आम्ही तपासून पहात आहोत. कुटुंबीयांनी सोमवारी श्रावणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले असून, तिच्या पालकांचा जबाब काही दिवसांमध्ये नोंदवला जाणार आहे. रविवारी नेमकं काय झालं आणि श्रावणीच्या परीक्षेबाबतही आम्ही त्यांच्याकडे विचारपूस करु, तसंच आग लागण्याबात अग्निशमन दलाच्या अहवालाचाही आम्ही विचार केल्यावरच घटनेमागचं नेमकं कारण समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी दादर पोलीस स्थानकामध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 16 year old girl killed in dadar police colony fire police says parents locked her in to make her study

ताज्या बातम्या