मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी मुंबईत गणेश विसर्जन सोहळा पार पडला. मुंबईतील मानाच्या गणपतींना निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या गर्दीत अनेकांचे मोबाइल गहाळ झाले तर काहींचे मोबाइल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या. काही भाविकांच्या मौल्यवान वस्तू, दागिनेही चोरीला गेले. संपूर्ण गणेशोत्सव काळात काळाचौकी पोलीस ठाण्यात सोनसाखळी आणि मोबाइल चोरीच्या ११ गुन्ह्यांची नोंद झाली. तर, १६० मोबाइल, कागदपत्रे, पाकीट गहाळ झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

लालबाग-परळ भागात अनेक मानाचे गणपती आहेत. लालबाग-परळ येथील मूर्ती कार्यशाळेतून अनेक गणपती मंडपस्थळी मार्गस्थ होतात. त्यामुळे गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरांची टोळ्या सक्रिय होतात. गणेशभक्तांचे मौल्यवान दागिने, वस्तू, मोबाइल चोरीच्या घटना घडतात. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन मिरवणुकीत १०० हून अधिक मोबाइल गहाळ अथवा चोरी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तर, लालबाग राजाच्या विसर्जनाच्यावेळी ५० हून अधिक मोबाइल गहाळ झाल्याच्या घटना घडल्या.

लालबाग-परळ, चिंचपोकळी या भागात सुरू असलेल्या मिरवणुकीत गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक जमले होते. मात्र, काही भाविकांचे मोबाइल, मौल्यवान वस्तू, तसेच पाकिटे आणि किमती साहित्य चोरी गेले. तर काही भाविकांचे मोबाइल गहाळ झाले. त्यामुळे भाविकांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात रांगा लावून तक्रार दाखल केली.

गणेश आगमनापासून विसर्जनापर्यंत (३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर) मोबाइल आणि सोनसाखळी चोरीचे एकूण ११ गुन्हे दाखल झाले. यापैकी ४ गुन्हे उघडकीस आले असून उघड गुन्ह्यांमध्ये ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, याच कालावधीमध्ये गर्दीमध्ये सुमारे १५० ते १६० पाकिटे, मोबाइल व इतर कागदपत्रे गहाळ झाली आहेत. पोलिस त्याचा तपास करीत आहेत.

– आनंद मुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळाचौकी पोलीस ठाणे</p>