scorecardresearch

१७ लाख राष्ट्रध्वज मुंबईकरांच्या घरी पोहोचते

‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टीचा दिवस असतानाही रविवारी शहरात ठिकठिकाणी राष्ट्रध्वजाचे वितरण केले.

१७ लाख राष्ट्रध्वज मुंबईकरांच्या घरी पोहोचते
( संग्रहित छायचित्र )

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ अभियासाठी मुंबई महानगरपालिकेला आतापर्यंत २६ लाख राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून मुंबई महानगरपालिकेला आपल्या कर्मचाऱ्यांच्या फौजेमार्फत आतापर्यंत १७ लाख राष्ट्रध्वज मुंबईकरांकडे सुपूर्द करण्यात यश आले आहे. उर्वरित नऊ लाख राष्ट्रध्वज लवकरच उपलब्ध होतील आणि त्यांचे वितरण करण्यात येईल. त्याचबरोबर बेस्ट बसगाड्या, थांबे, रस्त्यालगतचे मोठे फलक आदींवर जनजागृतीपर जाहिरात, पत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टीचा दिवस असतानाही रविवारी शहरात ठिकठिकाणी राष्ट्रध्वजाचे वितरण केले. या अभियानाअंतर्गत तब्बल ३५ लाख राष्ट्रध्वजांचे वितरण करण्यात येणार आहे. यापैकी २६ लाख राष्ट्रध्वज मुंबई महापालिकेला उपलब्ध झाले असून त्यापैकी सुमारे १७ लाख राष्ट्रध्वजांचे वाटप करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, राष्ट्रध्वजाला वंदन करणे आदींबाबत जनजागृती करण्यासाठी एक लाख पत्रकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या ३५० बस थांबे, २०० बसगाड्या, रस्त्यालगतच्या ५०० मोठ्या फलकांवर याविषयीचा संदेश असलेल्या जाहिराती लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणच्या लहान-मोठ्या रस्त्यांवर २५०० बॅनर्सही लावण्यात येणार आहे.

सरकारी इमारतींसह मरिन ड्राईव्ह परिसरातील काही इमारतींवर आकर्षक रोषणाई, लेसर शो करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे, तर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रभातफेऱ्यांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यचळवळीत सहभागी स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ मेळाव्यांचे आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 17 lakh national flag reaches the homes of mumbai mumbai print news amy

ताज्या बातम्या