१७वा पद्मश्री दया पवार पुरस्कार जाहीर

पद्मश्री दया पवार यांच्या १७व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर, प्रसिद्ध रेषाचित्रकार श्रीधर अंभोरे, पत्रकार आणि सामाजिक कार्यकत्रे संतोष खेडलेकर यांना पुरस्कृत करण्यात येणार

पद्मश्री दया पवार यांच्या १७व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर, प्रसिद्ध रेषाचित्रकार श्रीधर अंभोरे, पत्रकार आणि सामाजिक कार्यकत्रे संतोष खेडलेकर यांना पुरस्कृत करण्यात येणार असून हा पुरस्कार सोहळा दया पवार यांच्या जन्मगावी म्हणजेच नगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यात होणार आहे. ५००० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी अकोले येथील अगस्ती महाविद्यालयात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड आणि अगस्ती कला वाणिज्य आणि दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोलेचे प्राचार्य रमेशचंद्र खांडगे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रेमानंद रुपवते भूषविणार आहेत.
अकोल्यात दया पवार यांचे शिक्षण झाले. तेथे बालपणापासून घेतलेल्या जातीयतेचा दाहक अनुभव त्यांच्या ‘बलुतं’मधून व्यक्त झाला. ज्या गावाने त्यांच्या लेखणीला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य शिकवले त्याच गावी त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती प्रतिष्ठानतर्फे हिरा दया पवार यांनी दिली.
दर वर्षी विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांना दया पवार पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांनी तमाशातून सुरुवात करून ‘शापित’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘अन्यायाचा प्रतिकार’, ‘आई तुळजा भवानी’, ‘एक होता विदूषक’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ असे अनेक चित्रपट करत ३० वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत काम केले.
लावणीतील लिखित साहित्य जमवून तमाशाचा इतिहास गुंफण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्याचप्रमाणे पुरस्काराचे दुसरे मानकरी रेषाचित्रकार श्रीधर अंभोरे यांनी ‘िदडी आणि आदिम’ या चित्रमुद्रांकित या अनियतकालिकाचं अक्षरलेखन, चित्रांकन आणि संपादन केले. राष्ट्रीय पातळीवरील ‘फाय’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
‘श्रीधर आंबोरे आणि त्यांची चित्रे’ ही मुलाखत १२ वीच्या मराठी अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आली आहे, तर कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झालेले व्यवसायाने पत्रकार असलेले संतोष खेडलेकर यांनी कांताबाई सातारकर यांचे चरित्र लिहिले असून महाराष्ट्रातील पारंपरिक कलांचे जतन, कलावंतांचे मुख्य सामाजिक प्रवाहातील स्थान, तमाशा या विषयांवर व्याख्याने,वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृतीचे काम त्यांनी केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 17 padmashree daya pawar award declared