मुंबई : प्रसिद्धीच्या मोहापासून दूर अलिप्तपणे आपापल्या क्षेत्रात कार्यमग्न राहून समाजहिताच्या, देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने रचनात्मक कार्य करणाऱ्या १७ तरुण तेजांकितांचा केंद्रीय कामगार- रोजगार आणि पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. भविष्य घडवणाऱ्या वर्तमानाचा गौरव करणारा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळा शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कला, क्रीडा, मनोरंजन, साहित्य, प्रशासन, विज्ञान – तंत्रज्ञान, कायदा, नवउद्यमी, उद्योग अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्याने मापदंड निर्माण करणाऱ्या १७ प्रज्ञावंतांना ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुणांना कौतुकाची दाद देणारे हातही तितक्याच उंचीचे हवेत, हा ‘लोकसत्ता’चा आग्रह राहिला आहे. अभ्यासपूर्ण योगदान देणाऱ्या, स्वत:चे विचार ठामपणे मांडणाऱ्या आणि राजकारणाच्या पठडीबाहेर जाऊन विचार करणाऱ्या व्यक्तीच ‘तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हेही मराठी भाषा, भूगोल आणि राजकारण यांची इत्थंभूत माहिती असलेले अतिशय विचारी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे, अशा शब्दांत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सोहळय़ाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांमागचे उद्दिष्ट स्पष्ट करताना कुबेर म्हणाले, ‘‘वेगवेगळय़ा क्षेत्रांत समाजाला पुढे नेणारे कार्य करणाऱ्या तरुणांचा सन्मान करणे गरजेचे आहे, हे ओळखून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली. ‘तरुण तेजांकित पुरस्कार’ मिळवणाऱ्या प्रारंभीच्या मानकऱ्यांपैकी अनेकजण पुढे देश पातळीवरही नावारूपाला आले.’’

यावेळी प्रसिद्ध शास्त्रीय आणि फ्युजन संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिजीत पोहनकर यांनी ‘बॉलीवूड घराना’ हा वेगळा संगीतमय कार्यक्रम सादर केला. यावेळी पुरस्कार समितीचे सदस्य डॉ. मिलिंद अत्रे आणि ‘पीडब्लूसी’चे अल्पेश कांकरिया यांचा गिरीश कुबेर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांचा अल्प परिचय करून देणाऱ्या ध्वनी- दृश्यफितींसाठी प्रसिद्ध निवेदक विजय कदम यांचा आवाज लाभला होता. तर ‘रिजॉइस’चे वैभव बाबाजी यांनी दृश्यफितींच्या संयोजनाची जबाबदारी सांभाळली. प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले यांनी खुसखुशीत निवेदनशैलीत कार्यक्रम शेवटपर्यंत बांधून ठेवला.

बॉलीवूड घराना:  बॉलीवूड संगीत-रागदारीचा अनोखा मिलाफ

शास्त्रीय संगीत ऐकणारे बॉलीवूड संगीत चोरून ऐकतात, तर बॉलीवूड संगीत ऐकणारे शास्त्रीय संगीतापासून दूर पळतात, इतक्या चपखल शब्दांत संगीत रसिकांची कशी विभागणी होते

याचे वर्णन फ्युजन मास्ट्रो म्हणून नावाजलेल्या संगीतकार अभिजीत पोहनकर यांनी केले. संगीताच्या या दोन्ही प्रकारच्या दर्दी रसिकांना एका समेवर आणत संगीताचा आनंदानुभव देण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी ‘बॉलीवूड घराना’ ही अनोखी संगीत मैफल या सोहळय़ात सादर केली.

सर्वसाधारणपणे रागदारीवर बांधलेली हिंदी चित्रपटांतील गाणी रसिकांसमोर सादर केली जातात. मात्र शास्त्रीय संगीतात फ्युजनचे अभ्यासपूर्ण सुरेल प्रयोग करणाऱ्या अभिजीत पोहनकर यांनी आपला ‘बॉलीवूड घराना’ हा कार्यक्रम याबाबतीतही सर्वार्थाने कसा वेगळा आहे याची प्रचीती एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर करून दिली. ज्या लोकप्रिय हिंदी गाण्यांमध्ये शास्त्रीय रागांचा भाव लपला आहे, याची कल्पनाही येऊ शकणार नाही अशी गाणी आणि त्यातील रागाला अनुसरून बंदिश सहजी पेरून ही गाणी सादर करण्यात आली. या सुंदर रागदारीवर आधारित चित्रपट संगीताच्या मैफलीची सुरुवातच ‘ओमकारा’ चित्रपटातील ‘ओ साथी रे’ या भावगर्भ गाण्याने झाली. जोग रागातील बंदिशीची जोड देत हे गाणे सादर करण्यात आले.

आशा भोसले यांचा बहारदार आवाज आणि पंचमदा यांचे उत्फुल्ल संगीत हे नेहमीच थिरकायला लावणारे संगीत. या जोडीचे ‘पिया तू अब तो आजा’ हे गाणे ‘भीम पलास’ रागातील बंदिशीचा हात धरून आले आणि त्याने रसिकांची मने जिंकली. नव्वदच्या दशकातील ‘इंडीपॉप’ची जादू जागवणारे ‘परी हूँ मैं’ हे नितांतसुंदर हळवे गाणे चारुकेशी रागातील ‘रे मन कैसे रिझाऊ’ या बंदिशीत गुंफले गेले आणि गाण्याचा नूरच पालटला. एका वळणावर या सुरांच्या मैफलीने केवळ तालाची साथ घेतली आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाणी केवळ वाद्यांच्या सुरावटीतून रसिक मनात झिरपत राहिली. लता मंगेशकर आणि पंडित शिवकुमार शर्मा यांना अशी भावपूर्ण सुरेल आदरांजली वाहण्यात आली. ताला – सुरांचा हा खेळ कधी ‘तेरे बिना जिया जाए ना..’चा सूर आळवत, तर कधी नुसताच रागांच्या आलापीने रंगत गेला. रागदारी संगीताचा साज ल्यायलेली ही सुरेल मैफल टिपेला पोहोचली आणि टाळय़ांची एकच बरसात झाली.

अभिजीत पोहनकर यांच्यासह शास्त्रीय गायक सुरंजन खंडळकर, शास्त्रीय गायिका भाव्या पंडित, अनिरुद्ध शिर्के (ड्रम्सवादन), सौरभ जोशी ( गिटारवादन) आणि अक्षय जाधव (तालवाद्य) यांनी ‘बॉलीवूड घराना’ हा संगीतमय कार्यक्रम सादर केला.  ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळय़ात शास्त्रीय संगीतातील फ्युजन संगीत प्रयोगासाठी ओळखले जाणारे अभिजीत पोहनकर आणि त्यांचे सहकारी शास्त्रीय गायक सुरंजन खंडळकर, शास्त्रीय गायिका भाव्या पंडित, अनिरुद्ध शिर्के (ड्रम्सवादन), सौरभ जोशी (गिटारवादन), अक्षय जाधव (तालवाद्य) यांनी ‘बॉलीवूड घराना’ हा संगीतमय कार्यक्रम सादर केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 tarun tejankit honored by union minister bhupender yadav in mumbai zws
First published on: 26-03-2023 at 03:25 IST