नवी दिल्ली, मुंबई, ठाणे, पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर तपास यंत्रणांनी मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात मोठी कारवाई केली. त्यात महाराष्ट्रासह सात राज्यांत छापे टाकून १७० जणांना अटक करण्यात आली.   गेल्या गुरुवारी ‘एनआयए’ने १५ राज्यांत छापे घालून ‘पीएफआय’चे १०६ कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक केली होती. या कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात पोलिसांसह तपास यंत्रणांनी मंगळवारी महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेश या राज्यांत दिवसभर छापे घातले. राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) पोलिसांनी पुणे, नांदेड, औरंगाबाद, नगर, संगमनेर, मिरज, ठाण्यात छापे टाकून ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांची धरपकड केली.

हेही वाचा >>> ‘पीएफआय’बरोबरील रद्द करारावरून राजकारण; पुण्यात भाजप, राष्ट्रवादी यांची परस्परांवर टीका

हेही वाचा >>> निर्णय निवडणूक आयोगाच्या कोर्टात; पक्षचिन्हाबाबत सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

ठाणे जिल्ह्यात ‘पीएफआय’च्या सहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यात नवी मुंबई आणि मुंब्र्यातील प्रत्येकी दोन, भिवंडी आणि कल्याणमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. कल्याण आणि भिवंडी येथील दोघांना वैयक्तिक हमीवर सोडून देण्यात आले. पुण्यात कोंढवा पोलिसांनी अब्दुल अजीज बन्सल, माज फैजान शेख, मोहम्मद कैस अन्वर शेख, काशीफ नजीर शेख, दिलावर करीम सय्यद, आयमूल रशीद मोमीन या सहा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून घोषणाबाजी केली. परवानगी नसताना आंदोलन करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आहे.

हेही वाचा >>> भारत-जपान मैत्रीत आबे यांचे मोठे योगदान; पंतप्रधान मोदी यांची श्रद्धांजली; अंत्यसंस्कारांस जगभरातील नेते

नांदेडमध्ये ‘पीएफआय’च्या पाच संशयित कार्यकर्त्यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री आबेद अली महमूद अली या संशयिताला नांदेडमध्ये अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ३० सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. औरंगाबादमधील जिन्सी, सिडको एमआयडीसी आणि हर्सूल भागातील १४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यापैकी दहा कार्यकर्त्यांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले. चौघांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये एका मौलानाला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले. संगमनेर खुर्द येथे ही कारवाई करण्यात आली आहे. नगर शहरातील मुकुंदनगर भागात छापा टाकून जुबेर अब्दुल सत्तार शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. त्याची हमीपत्रावर मुक्तता करण्यात आली. मिरज येथील निमजगा माळ येथे राहणाऱ्या ३० वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगलीमध्ये त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याला प्रतिबंधक कारवाईसाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा >>> भारतासह पाकिस्तानही अमेरिकेचा भागीदार; अमेरिकेची प्रतिक्रिया

कुठे, किती जणांवर कारवाई?

महाराष्ट्र आणि आसाममध्ये प्रत्येकी २५ जणांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ५७, दिल्लीत ३०, मध्य प्रदेशात २१, गुजरातमध्ये १० जणांना अटक करण्यात आली. कर्नाटकमध्येही काही जणांवर कारवाई करण्यात आली.