मुंबई :  दिवाळीच्या दिवसांत मुंबईकरांना दिलासा मिळाला असून अनेक महिन्यांनंतर रुग्णसंख्या २०० पेक्षा कमी झाली आहे. मुंबईत शनिवारी करोनाचे १७६ नवीन रुग्ण आढळले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला.

 मुंबईत शनिवारी २५ हजार ४३१ चाचण्या करण्यात आल्या असून यात १७६ नवीन रुग्ण आढळले तर ४६७ रुग्ण बरे झाले. याबरोबरीने मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा सात लाख ५७ हजार ४४८ असा झाला आहे. तर मृतांचा एकूण आकडा १६ हजार २७३ असा झाला असून आतापर्यंत सात लाख ३५ हजार ६०२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत ३०३१ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईतील रुग्ण वाढीत दिवसेंदिवस घट होत आहे.  ऑक्टोबरमध्ये रुग्ण वाढीचा दर ५ ते ७ टक्के दरम्यान होता. पण आता नोव्हेंबरमध्ये मात्र हा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आला असून शनिवारी तर हा दर तीन टक्क्यांवर आला. सध्या मुंबईत ३० इमारती प्रतिबंधित असून एकही  झोपडपट्टी आणि चाळ प्रतिबंधित नाही.

 दरम्यान, ठाणे जिल्ह्यात शनिवारी ९५ करोना रुग्णांची नोंद झाली, तर चार जणांचा मृत्यू झाला. करोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे चित्र आहे. दिवसभरातील ९५  रुग्णांत ठाणे ३३, नवी मुंबई २५, कल्याण-डोंबिवली २०, ठाणे ग्रामीण आठ, अंबरनाथ चार, बदलापूर दोन, मिरा भाईंदर दोन आणि उल्हासनगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.  चार मृतांपैकी नवी मुंबई तीन आणि कल्याण-डोंबिवली  पालिका क्षेत्रातील एकाचा मृत्यू झाला.