आरोग्य सुविधांसाठी ४७८ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पाश्र्वाभूमीवर राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी ४५७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी २८७ कोटी २७ लाख रुपये केंद्र सरकारचे असून राज्याचा हिस्सा १९१ कोटी ५१ लाख रुपयांचा आहे.

केंद्र सरकारने राज्याला या आर्थिक वर्षात सुमारे १८०० कोटी रुपयांचे अनुदान दिले असून राज्य सरकारने ४० टक्के हिस्सा देताना ९८४ कोटी रुपये दिले आहेत.

करोना संकटामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत शासकीय रुग्णालयातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक त्रास होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आल्याने जिल्हा स्तरावरील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे बाल आरोग्य कार्यक्रम,लसीकरण, पल्स पोलिओ मोहीम आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.