187 beautification works started today Shinde group BJP preparations Mumbai municipal elections Mumbai news ysh 95 | Loksatta

सुशोभीकरणाच्या १८७ कामांचा आज प्रारंभ; शिंदे गट – भाजपची मुंबई महापालिका निवडणूक तयारी सुरू

आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळय़ासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारने मिशन मुंबई हाती घेतले आहे.

सुशोभीकरणाच्या १८७ कामांचा आज प्रारंभ; शिंदे गट – भाजपची मुंबई महापालिका निवडणूक तयारी सुरू
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळय़ासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारने मिशन मुंबई हाती घेतले आहे. त्यानुसार मुंबईचा कायापालट करण्यासाठी १८७ सुशोभीकरण कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे शहराचे सौंदर्यीकरण करून  मुंबईचा कायापालट करावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनास दिले आहेत.

मुंबई महापालिकेची  लवकरच निवडणूक होणार असून पालिकेतील ठाकरे गटाची सत्ता हिसकावून घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे. सातत्याने मुंबईतील सौंदर्यीकरणाच्या कामांचा आढावा घेतला जात आहे. आजही  शिंदे आणि फडणवीस यांनी मुंबईत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या वेळी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह खासदार राहुल शेवाळे, आमदार आशीष शेलार आदी उपस्थित होते.  मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी मुंबई सौंदर्यीकरणाचे सादरीकरण केले.  मुंबईतील रस्त्यांच्या वरच्या थरांचे नूतनीकरण, पदपथ, रस्ते, पूल, वाहतूक बेटं, वॉलपेंटिंग, उद्याने आणि कोळीवाडे यांच्या सुशोभीकरणाची माहिती या वेळी देण्यात आली. त्यावर सुशोभीकरणाच्या कामाला गेल्या चार महिन्यांत वेग देण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कोळीवाडय़ांचे सौंदर्यीकरण, आपला दवाखाना यांसारख्या निर्णयांमुळे गतिमान मुंबईच्या वैभवात भर पडणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. झोपडपट्टी भागात कम्युनिटी वॉशिंग मशिन ही संकल्पना अमलात आणावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

‘शहराचा कायापालट करा’

जी-२० परिषदेच्या बैठका महाराष्ट्रात होत असून त्यातील पहिल्या बैठका मुंबईत होणार आहे. हा मान आपल्या राज्याला आणि मुंबईला मिळाला असून त्यासाठी शहराचा कायापालट करून त्यांचे ब्रँडिंग जोरदारपणे करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 00:49 IST
Next Story
‘धारावी प्रकल्पाचे काम केवळ पाच हजार कोटींना कसे दिले?’; गैरव्यवहार असल्याचा पटोले यांचा आरोप