मुंबई :  मुंबईत परदेशातून आलेले  आणखी सहा प्रवासी बाधित आढळल्याने आता बाधित प्रवाशांची संख्या १९ झाली आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील सहा जण बाधित असल्याचे आढळले आहे.

नव्याने बाधित आढळलेल्या प्रवाशांपैकी तीन दक्षिण आफ्रिकेहून, एक मॉरिशस तर उर्वरित युरोप आणि ब्रिटनमधून आले आहेत. अशा एकूण २५ जणांची नमुने जनुकीय तपासणीसाठी दिल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

धारावीत एक रुग्ण

पूर्व आफ्रिकेतील टांझानियातून धारावीत आलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. टांझानिया हा देश जोखमीच्या देशांपैकी नसला तरी या व्यक्तीचे नमुने जनकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या निकटच्या संपर्कातील लोकांच्याही चाचण्या करण्यात आल्या आहेत.

धारावी या अत्यंत दाटीवाटीच्या वस्तीत करोना काळात पालिकेने चोख कामगिरी करीत संसर्ग आटोक्यात आणला होता. सध्या धारावीत दररोज जेमतेम एक ते दोन नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तर अनेकदा दैनंदिन रुग्णांची संख्या शून्य असते. उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी कमी होत असून सध्या केवळ पाच रुग्ण उपचाराधीन आहेत. धारावीची करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच आता जगभरात ओमायक्रॉनचा धोका निर्माण झाल्यामुळे पालिकेची यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे आढळून आले.  त्या व्यक्तीला मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विमानतळावर या व्यक्तीची चाचणी केली असता तो बाधित आढळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याचा रहिवासी पत्ता धारावीतील असून तो धारावीत येण्यापूर्वीच त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

या व्यक्तीचे नमुने जनुकीय चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवले आहेत. मात्र पालिकेच्या जनुकीय चाचणी यंत्रणेची क्षमता ३८० नमुन्यांची आहे. तोपर्यंत थांबणे शक्य नसल्यास हे नमुने पुण्याला चाचणीसाठी पाठवले जातील व चार दिवसात त्याचा अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

दरम्यान, विमानतळावर या व्यक्तीला घेण्यासाठी आलेल्या दोघांच्याही चाचण्या करण्यात आल्या असून त्याचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

टांझानियातून आलेली व्यक्ती करोना बाधित आढळल्यामुळे मुंबईत परदेशांतून आलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १० झाली आहे. या सर्व बाधित प्रवाशांवर पालिकेच्या मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या प्रवाशांवर उपचार करण्यासाठी सेव्हन हिल्समधील पूर्ण मजला राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर बॉम्बे रुग्णालय आणि ताडदेवचे ब्रीच कँण्डी रुग्णालयातही बाधित प्रवाशांसाठी खाटा आरक्षित ठेवण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.

डोंबिवलीतील ओमायक्रॉनच्या रुग्णाची प्रकृती स्थिर 

कल्याण : डोंबिवलीत गेल्या आठवडय़ात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ३२ वर्षांच्या नागरिकाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीतून शनिवारी स्पष्ट झाले. या रुग्णाला कल्याणमधील पालिकेच्या  संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.  त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णावर आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक नियमावलीप्रमाणे वैद्यकीय उपचार केले जात आहेत. करोना रुग्णावर उपचाराची यापूर्वीची जी पद्धत आहे, तीच या रुग्णासाठी वापरली जात आहे.  या रुग्णाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असला तरी त्याला ताप, सर्दी, खोकला अशी कोणतेही लक्षणे नाहीत. त्याचे नियमित समुपदेशन केले जात आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. या रुग्णाला पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले जात आहेत. सात दिवसानंतर या रुग्णाच्या करोना चाचण्या, आवश्यक इतर चाचण्या केल्या जाणार आहेत. शासन आदेशाशिवाय या रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवले जाणार नाही, असे आयुक्तांनी सांगितले. रशिया, नेपाळ आणि नायजेरियातून आलेल्या एकूण सहा जणांना करोनाचा संसर्ग असल्याचे शनिवारी आढळले होते. त्यांना आर्ट गॅलरी संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविले जाणार आहेत.  दरम्यान, गेल्या काही महिन्यांत कल्याण- डोंबिवलीत २९४ जण परदेश प्रवास करून आले आहेत. त्यांपैकी बहुतेकांनी लस घेतली आहे.

मुंबईत २१३ नवे रुग्ण

मुंबई : मुंबईत रविवारी करोनाच्या २१३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला. तर २१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत राज्यात सात लाख ४३ हजार ११५ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.

मुंबईत ३८ हजार ९२३ चाचण्या झाल्या. त्यात १९५ नवे रुग्ण आढळले. मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा सात लाख ६३ हजार ८३५ वर गेला आहे.  रविवारी मुंबईत एक रुग्ण दगावला असून  एकूण मृत होणाऱ्या करोना रुग्णांची संख्या १६ हजार ३४९ वर गेली आहे.  

राज्यात ७०७ जणांना संसर्ग

राज्यात दिवसभरात ७०७ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, सात जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्हा १६१, नगर जिल्हा ३५, मराठवाडा ४७, विदर्भात २० नवे रुग्ण गेल्या २४ तासात आढळले. राज्यात ७,१५१ रुग्ण उपचाराधीन असून, सर्वाधिक १८८२ रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. 

ठाणे जिल्ह्यात ११२ बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी ११२ करोना रुग्ण आढळून आले. तर, एकाही मृताची नोंद नाही. जिल्ह्यातील ११२ करोना रुग्णांपैकी ठाणे ३७, नवी मुंबई २९, कल्याण-डोंबिवली २६, ठाणे ग्रामीण ११, उल्हासनगर तीन, मीरा-भाईंदर दोन, अंबरनाथ दोन, भिवंडी आणि बदलापूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.