तीन मजली इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू; कुर्ला येथील दुर्घटनेत १४ जण जखमी

कुर्ला पूर्व येथील एक तीन मजली इमारत सोमवारी मध्यरात्री कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले.

तीन मजली इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू; कुर्ला येथील दुर्घटनेत १४ जण जखमी
कुर्ला येथे तीन मजली इमारत कोसळली

मुंबई : कुर्ला पूर्व येथील एक तीन मजली इमारत सोमवारी मध्यरात्री कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. जखमींपैकी तिघांना राजावाडी, तर अन्य एकाला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित दहा जणांना राजावाडी रुग्णालयात उपचारानंतर घरी सोडण्यात आले. 

कुर्ला पूर्वेतील एस. जी. बर्वे मार्गावरील एसटी स्थानकाच्या मागे असलेल्या नाईक नगर सोसायटीत सोमवारी रात्री ११़ ४५ वाजता ही दुर्घटना घडली़  याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.

या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजय भोले पासफोर (२८), अजिंक्य प्रल्हाद गायकवाड (३४), कुशर प्रजापती (२०), सिंकदर राजभर (२१), अरिवद राजेंद्र भारती (१९) अनुप राजभर (१८), अनिल यादव (२१), श्याम प्रजापती (१८), लिलाबाई प्रल्हाद गायकवाड (६०), प्रल्हाद गायकवाड(६५), गुड्डू पासफोर (२२), राहुल कुमार मांझी (२१), ब्रिजकुमार मांझी (२२), पप्पू कुमार मांझी (३५),महेश राम (४०), विनोद जाऊ मांझी (३५) यांचा समावेश असून, उर्वरित तिघांची ओळख पटलेली नाही.

या दुर्घटनेतील जखमींमध्ये चैहफ बसपाल (३६), संतोषकुमार गौड (२५), सुदेश गौड (२४), रामराज रहमानी (४०), संजय माझी (३५), आदित्य कुशवाह (१९), अबिद अन्सारी (२६), गोविंद भारती (३२), मुकेश मौर्य (२५), मनिष यादव (२०), देवकी बलिया (४२), प्रित बलिया (१७), दुधनाथ यादव (२२) यांचा समावेश आहे. त्यातील दहा जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.  दुर्घटनेतील एक जखमी अखिलेश मांझी याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी १५ जण अडकल्याची भीती

दुर्घटनाग्रस्त इमारतीत सुमारे ५० जण राहत होते. त्यापैकी १९ मृत आणि १४ जखमी मिळून ३३ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. आणखी १५ हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य सुरूच आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाख  कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.  जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याची सूचना त्यांनी दिली.  बचाव पथकांचे काम आणि अनुषांगिक सुविधांबाबतही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना सूचना दिल्या.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कुर्ल्यातील नाईक नगर इमारत दुर्घटना: क्षणात अनेकांचे संसार ढिगाऱ्याखाली ; रात्रभर बचावकार्याची धडपड, दिवसभर गर्दीमुळे गोंधळ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी