लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांतील उर्वरित बांधकामासाठी एकूण सहा टप्प्यांत निविदा मागविल्या होत्या. नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून सुमारे ११ हजार कोटी रुपयांच्या कामाच्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई – नागपूर समृध्दी महामार्ग विस्तारीकरणातील नागपूर – गोंदिया आणि भंडारा – गडचिरोली महामार्ग प्रकल्पातील एकूण तीन टप्प्यांसाठी ११ निविदा सादर झाल्या आहेत. तर पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्पातील शेवटच्या तीन टप्प्यांतील कामांसाठी एकूण आठ निविदा सादर झाल्या आहेत.
एमएसआरडीसीच्या चार हजार किमीहून अधिका लांबीच्या रस्ते प्रकल्पातील महत्त्वाकांक्षी अशा पुणे वर्तुळाकार, नागपूर – गोंदिया आणि भंडारा-गडचिरोली प्रकल्पातील काही टप्प्यांतील कामासाठी मार्चमध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुणे वर्तुळाकार रस्त्याच्या नऊ टप्प्यासह भंडारा – गडचिरोली आणि नागपूर – गोंदिया द्रुतगती मार्गातील काही टप्प्यातील कामासाठीच्या निविदा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र या निविदा वाढीव दराने आल्याने त्यांचे मूल्यांकन आणि नव्याने निविदांचे दर निश्चित करून निविदा अंतिम करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीकडून राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या तिन्ही प्रकल्पांच्या कामाला शक्य तितक्या लवकर सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. एमएसआरडीसीने आधीच्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच उर्वरित टप्प्यातील बांधकामासाठी जुलैमध्ये निविदा मागविल्या होत्या. काही तांत्रिक कारणामुळे या तीन प्रकल्पांतील सहा टप्प्यांसाठी मार्चमध्ये एमएसआरडीसीला निविदा मागविता आल्या नव्हत्या.
एकूण ११ हजार कोटींच्या या तीन प्रकल्पांसाठीच्या तांत्रिक निविदा नुकत्याच खुल्या करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यानुसार पुणे वर्तुळाकार रस्त्यातील शेवटच्या तीन टप्प्यांसाठी आठ, भंडारा – गडचिरोली महामार्गातील शेवटच्या दोन टप्प्यांतील कामासाठी सात आणि नागपूर – गोंदिया महामार्गाच्या एका टप्प्यासाठी चार निविदा सादर झाल्या आहेत. ॲफकॉन्स, पटेल इन्फ्रास्ट्रक्चर, नवयुगा इंजिनीयरिंग, पीएनसी अशा कंपन्यांच्या या निविदा आहेत. आता या निविदांची छाननी करून लवकरच आर्थिक निविदा खुल्या केल्या जातील. त्यानंतर निविदा अंतिम करून कामाचे कंत्राट देण्यात येणार असून त्यानंतर शक्य तितक्या लवकर कामाला सुरुवात करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.
नागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्ग
टप्पा एनजी-२ अ- ३५.२५ किमीचा टप्पा
ॲफकाॅन्स इन्फ्रास्ट्रक्चर, इरकाॅन इंटरनॅशनल, पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लि. आणि पीएनसी इन्फ्राटेक या चार कंपन्यांच्या निविदा सादर
भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग
टप्पा बीजी ०२ – ३४.७५ किमीचा टप्पा
ॲफकाॅन्स इन्फ्रास्ट्रक्चर, इरकाॅन इंटरनॅशनल, माॅटेंकार्लो लि, पीएनसी इन्फ्राटेक या चार कंपन्यांच्या निविदा सादर
टप्पा बीजी ०३-३४.७८६ किमीचा टप्पा
ॲफकाॅन्स इन्फ्रास्ट्रक्चर, इरकाॅन इंटरनॅशनल आणि पीएनसी इन्फ्राटेक या तीन कंपन्यांच्या निविदा सादर
पुणे वर्तुळाकार रस्ता
टप्पा ई५- ॲफकाॅन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवयुगा इंजिनीयरिंगच्या निविदा
टप्पा ई ६-जीआर इन्फ्रा, माॅटेंकार्लो लि, पीएनसी इन्फ्राटेक आणि पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लि. या चार निविदा सादर
टप्पा ई७-माॅटेंकार्लो लि आणि नवयुगा इंजिनीयरिंग अशा दोन कंपन्यांच्या निविदा सादर