१९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिका खटल्यातील दोषी मुस्तफा डोसा आणि फिरोज खान यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी सीबीआयकडून करण्यात आली. मुंबईतील विशेष टाडा न्यायालयात १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिका खटल्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुनावणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना सहा जणांना दोषी ठरवले होते. यामध्ये मुस्तफा डोसा आणि फिरोज खान यांचाही समावेश होता. सध्या दोषींच्या शिक्षेप्रकरणी न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे.

आरोपीच्या पिंजऱ्यात आनंद आणि दु:खही

फिरोज खानने सोमवारी आजन्म कारागृहात ठेवा पण फासावर लटकवू नका, असा आक्रोश न्यायालयात केला होता. तर आपले वर्तन किती चांगले आहे हे दाखवण्यासाठी त्याने कारागृहातील दोन आरोपींना साक्षीदार म्हणून हजर करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. त्याची विनंती मान्यही करण्यात आली. मात्र बुधवारी त्याच्या वकिलांनी हे साक्षीदार तपासण्यास नकार दिला. परिणामी वेळ वाया गेल्याच्या कारणास्तव न्यायालयाने फिरोजला दोन हजार रुपयांचा दंड सुनावला होता. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वकिलांनी  फिरोज खान याचा बॉम्बस्फोटाच्या कटातील सहभाग याकुब मेमनइतकाच महत्त्वपूर्ण असल्याचा दावा करत त्याला फाशी देण्याची मागणी केली. या खटल्यातील प्रमुख दोषी मुस्तफा डोसाला फाशीची देण्याची मागणी सीबीआय करेल, अशी अटकळ यापूर्वीच बांधली जात होती.  ही अटकळ आज खरी ठरली.

डोसा आणि सालेमसह फिरोज अब्दुल रशिद खान, करीमुल्ला खान उर्फ हुसेन हबीब शेख, ताहिर महोम्मद र्मचट उर्फ ताहिर टकल्या या पाचजणांना न्यायालयाने ‘टाडा’ कायदा आणि भारतीय दंडविधानाच्या कलम १२० (ब) नुसार बॉम्बस्फोटाचा कट रचणे, तो कट अंमलात आणून शेकडो निष्पापांची हत्या करणे वा हत्येचा कट रचल्याच्या प्रमुख आरोपांमध्ये दोषी ठरवले होते व रियाझ सिद्दीकी याला केवळ ‘टाडा’ कायद्याअंतर्गत दोषी ठरवले होते. तर अब्दुल कय्यूम करिम शेख हा एकमेव आरोपी आहे, ज्याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती.