१२ मार्च १९९३ हा दिवस मुंबईच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला. या दिवशी मुंबईत विविध ठिकाणी भीषण बॉम्बस्फोट झाले. यात शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले, तर ७००हून अधिक जण गंभीर जखमी झाले. एकामागोमाग एक अशा बॉम्बस्फोटाच्या १२ घटनांनी मुंबई हादरून गेली होती. त्यावेळी संजय दत्तचं नाव समोर आलं होतं. कटात बॉलिवूडमधले काही कलाकार सहभागी असल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळे पोलिसांनी संशयाच्या आधारे चित्रपट निर्माते हनीफ कडावाला आणि समीर हिंगोराला चौकशीसाठी बोलावलं. संजय दत्तला अटकही झाली होती. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? संजय दत्तने AK 56 का मागवली होती? कुणाकडून मागवली होती? या सगळ्या बाबत मुंबईचे माजी पोलीस सह आयुक्त सुरेश वालिशेट्टी यांनी एका पॉडकास्टमध्ये माहिती दिली आहे.
सुरेश वालिशेट्टी यांनी काय सांगितलं?
संजय दत्तला १९९३ मध्ये अटक झाली होती. त्याचं कारण होतं त्याने बाळगलेली AK 56 ही गन. १९९३ च्या आधी ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशिद पाडण्यात आली, त्यावेळी मुंबईत हिंदू-मुस्लिम दंगे उसळले होते. मुंबई पेटली होती. बाबरी पाडली गेल्याचा बदला घेण्यासाठी मार्च १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले. त्यावेळी आमची धरपकड कारवाई सुरु झाली होती. संजय दत्त यात आहे की नाही हे आम्हाला माहीत नव्हतं. पण हनीफ कडावाला आणि समीर हिंगोरा या दोघांना आम्ही ताब्यात घेतलं होतं. त्यांची चौकशी सुरु झाली होती. आम्ही संशयितांचे फोन टॅप करत होतो. त्या काळात मोबाइल किंवा कॅमेरे नव्हते. हनीफ कडावाला आणि समीर हिंगोराला आम्ही ताब्यात घेतलं. हनीफ कडावालाने सांगितलं या बॉम्बस्फोटांमध्ये संजय दत्तचा हात आहे. त्याने आम्हाला सांगितलं संजय दत्तकडे AK 56, हँड ग्रेनेड, बंदुकीचे राऊंड्स सगळं ठेवलं आहे. आम्ही हे ऐकल्यावर चकित झालो. कारण संजय दत्तचं नाव तोपर्यंत कधीही समोर आलं नव्हतं. अशी माहिती सुरेश वालिशेट्टी यांनी हुसैन झैदी यांच्या पॉडकास्टमध्ये दिली आहे.

एक दिवस बातमी आली आणि…
आम्ही जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरु केली तेव्हा आम्ही सगळ्यात आधी चौकशी केली की संजय दत्त मुंबईत आहे का? सुनील दत्त मुंबईत आहेत का? आम्हाला हे समजलं संजय दत्त तेव्हा मॉरिशसला गेला होता आणि सुनील दत्त हे तेव्हा अमेरिकेत होते. आतीश या चित्रपटाचं शूटिंग संजय दत्त करत होता. संजय दत्तचं नाव आलं आहे हे फक्त मला, वाय.सी. पवार, राकेश मारिया यांना काही मोजक्याच अधिकाऱ्यांना माहीत होतं. अमरसिंग सांबरा यांच्याकडे चार्ज होता. पुढे काय घडलं ते आम्हाला माहीत नाही. पण एक दिवस आम्ही एका इंग्रजी वृत्तपत्रात हेडलाइन वाचली की संजय दत्तकडे AK 56 रायफल आहे. बलजित परमारने ती बातमी दिली होती. बलजित परमार हा पत्रकार तेव्हा अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. त्याने ही बातमी केली आणि त्यामुळे सगळ्यांना ती बातमी कळली. बातमी वाऱ्यासारखी पसरली. संजय दत्तलाही ही बातमी कळली. त्याने कदाचित वडिलांचा सल्ला तेव्हा घेतला असेल. त्यानंतर अमरजित सांबरा यांना संजय दत्तने फोन केला. हे मी काय वाचतोय, माझी बदनामी चालली आहे. माझं नाव खराब करत आहेत वगैरे म्हणाला. सांबरा म्हणाले की तू काही केलं नाहीस तर घाबरतोस कशाला? आम्ही तुला काही करणार नाही. तू काही केलं नाहीस तर प्रश्न मिटला. तुझी चौकशी करु आणि तुला सोडून देऊ असं सांबरा यांनी संजय दत्तला सांगितलं. संजय दत्तने काही दिवसांनी तो मुंबईला येतो आहे हे त्यांना फोन करुन सांगितलं. त्यानंतर एम. एन. सिंग, राकेश मारिया यांना कळलं. आमचं पथक विमानतळावर गेलं. त्याला आम्ही क्राईम ब्रांचमध्ये आणून बसवलं. संजय दत्तला उद्या सकाळपर्यंत काहीही विचारु नका असं आम्हाला एम. एन. सिंग यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी एम. एन. सिंग यांनी चौकशी सुरु केली. असं वालिशेट्टी यांनी सांगितलं.
संजय दत्तने पोलीस चौकशीत काय सांगितलं होतं?
१) सुरुवातीला संजय दत्त म्हणाला की मला यात बदनाम केलं जातं आहे. AK 56 वगैरे माझ्याकडे काहीही नाही. जे काही घडलं ते सगळं खोटं आहे.
२) एम. एन. सिंग म्हणाले हे बघ संजय आम्हाला सगळं माहीत आहे. तू खरं बोललास तर सगळं बरं होईल. त्यावर संजय दत्त म्हणाला की मला हत्यार बाळगायची गरजच काय? माझ्या घरी पोलिसांची सुरक्षा आहे. मला उगाच बदनाम केलं जातं आहे.
३) यानंतर सिंग यांनी मला हाक मारली आणि हनीफ कडावालाला घेऊन ये सांगितलं. हनीफ कडावाला आणि समीर हिंगोरा आले. त्यांनीही संजय दत्तला समजावलं जे काही आहे ते सांगून टाक. खरं बोल. कारण हे मुंबई पोलीस आहेत.
४) अखेर संजय दत्तने कबुली दिली की त्याने AK 56 बाळगली आहे. काय घडलं ते पण त्याने सांगितलं. बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर मला धमक्या दिल्या जात होत्या, तुझ्या बहिणीवर बलात्कार करु सांगितलं जात होतं म्हणून मी बंदुक मागवली होती असं संजय दत्तने सांगितलं.
५) वालिशेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय दत्तने सांगितलं की त्याने त्यावेळी दाऊदचा भाऊ अनिस इब्राहीमला फोन केला. अनिस इब्राहिमने त्याला विश्वास दिला की तू घाबरु नकोस. मी तुझ्याकडे सगळं सामान पाठवतो.
६) समीर हिंगोरा आणि हनीफ कडावाला संजय दत्तच्या घरी जायला तयार नव्हते. अनिसने त्यांना धमकावलं आणि पाठवलं. ज्यानंतर संजय दत्तच्या घरी हे दोघं गेले.तिथे त्यांनी चार एके ५६, ५० ते ६० हँड ग्रेनेड आणि ४०० राऊंड काडतुसं पाठवली होती. हे पाहून संजय दत्त पुन्हा घाबरला त्याने अनिसला फोन करुन सांगितलं की हे सगळं मला नको. हे तू घेऊन जा.
७) ज्यानंतर अबू सालेम, हनीफ कडावाला आणि समीर हिंगोरा हे सगळे त्याच्या घरी गेले. त्यांना संजय दत्तने चारपैकी तीन बंदुका परत केल्या. एक बंदूक ठेवली आणि तीन चार हँड ग्रेनेड्स ठेवले. अबू सालेम, हनीफ कडावाला आणि समीर हिंगोरा सगळ्या बंदुका घेऊन निघाले तेव्हा नाकाबंदी सुरु झाली होती.
८) अबू सालेमने झेबुन्निसाकडे ते सगळी शस्त्रं ठेवली. आम्ही चार तासांत घेऊन जातो असं सालेमने तिला सांगितलं असं सगळं पोलिसांना संजय दत्तने सांगितलं.

संजय दत्तने एक एके ५६ बद्दल काय सांगितलं?
त्यानंतर त्याला विचारणा झाली की तू एक एके ५६ ठेवली होती ती कुठे आहे? त्यावेळी त्याने सांगितलं की मी पेपरमध्ये वाचलं तेव्हा मी युसुफ नळवालाला फोन केला आणि सांगितलं की ते सगळं घेऊन जा. मग आम्ही युसुफ नळवालाच्या घरी संजय दत्तला बुरखा घालून घेऊन गेलो. कारण तो डोंगरीमध्ये राहात होता. युसुफ नळवालाकडे एक हत्यार होतं. त्याचा परवाना एक्स्पायर झाला होता म्हणून पोलीस त्याला पकडून घेऊन गेले होते. मग आमच्या पोलीस ठाण्यात युसुफला बोलवण्यात आलं. युसुफ नळवालाने सांगितलं की त्याने ती बंदूक एका पारशाकडे दिली होती आणि अबू सालेम तोपर्यंत फरार झाला होता. युसुफ नळवाला आणि संजय दत्तची ओळख शिकारीमुळे झाली होती. संजय दत्तची सगळी हत्यारं मी सांभाळतो त्यांची देखभाल करतो असं युसुफने सांगितलं. तसंच बंदुकीबाबत माहिती दिली. पारसी माणूस केलसी म्हणून आहे त्याला मी ती बंदुक दिली आहे असं युसुफने सांगितलं. त्याने त्याच्या वर्कशॉपवर ती बंदूक जाळली होती. आम्ही ते सगळे पुरावे गोळा केले. रिव्हॉल्वर मी दुसऱ्या पारशाला दिली आहे, तो बांद्र्यात राहतो असं सांगितलं. त्याने आम्हाला अजय मारवाच्या घरी नेलं. अजय मारवाच्या वडिलांना ती बंदुक हवी होती. त्याचे वडील घरी नव्हते. त्यामुळे अजय मारवाला त्याने ती बंदुक दिली होती. अजय मारवाला काहीही माहीत नव्हतं. त्या सगळ्यांवर टाडा लागला होता अशी माहिती वालिशेट्टी यांनी पॉडकास्टमध्ये दिली. मात्र आम्ही सगळ्या गोष्टी ज्या चौकशी केल्या होत्या त्यावरुन हे सांगू शकतो की संजय दत्तला बॉम्बस्फोट होणार आहेत याची माहिती नव्हती. असंही वालिशेट्टी यांनी सांगितलं.
