मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाहनांच्या संख्येत ५.९ टक्के वाढ झाली. जानेवारीमध्ये मोटार वाहनांची संख्या पाच कोटींच्या आसपास होती. राज्यातील रस्त्यावर प्रति किलोमीटर १४९ वाहने असून डिसेंबर अखेर ६ लाख ४४,७७९ विद्युत वाहनांची नोंद झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत त्यात अडीच लाख वाहनांची भर पडली. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) १५,५६० गाड्यांनी गेल्या वर्षभरात प्रति दिन सरासरी ५८.६९ लाख प्रवासी वाहतूक केली असून एसटीच्या प्रवासी संख्येत वर्षभरात ३.२ टक्यांनी वाढ झाली.

राज्याच्या विकासात पायाभूत सुविधा त्यातही रत्यांचे जाळे महत्त्वाचे असले तरी महराष्ट्रात गेल्या वर्षभरात केवळ तीन हजार किलोमीटर नव्या रस्त्यांची भर पडली आहे. राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्गात गेल्या वर्षभरात कोणतीही भर पडलेली नसल्याने राज्याच्या रस्ते विकासाचा वेग मंदावल्याचे आर्थिक पाहणीतून समोर आले आहे. राज्यात मार्च २०२४ अखेर राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्य महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते असे एकूण ३.२८ लाख किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे आहे. त्यामध्ये १८ हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग आणि २,६९२ किलोमीटर लांबीच्या प्रमुख महामार्गांचा समावेश आहे. मात्र राज्य महामार्गांत ३०,४६५ किलोमीटरवरून ३०,९२२ किलोमीटर अशी जेमतेम ४५७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची भर पडली आहे.

कोणत्या रस्त्यांची कामे?

मेट्रोमधून किती प्रवास?

● मुंबईतील घाटकोपर- वर्सोवा : दररोज पाच लाख

● दहिसर ते डीएननगर आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व : १.५२ लाख

● मेट्रो मार्गिका ३- आरे- बीकेसी : २१ हजार ६९३

● पुणे मेट्रो : १.२० लाख ● नागपूर मेट्रो : ९० हजार

कोणत्या रस्त्यांची कामे?

● केंद्रीय रस्ते निधी योजनेअंतर्गत राज्यातील १५६२ मंजूर कामांपैकी ७५ टक्के कामे पूर्ण

● मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात हाती घेण्यात आलेल्या ९ हजार ९९५ रस्त्यांच्या कामांपैकी ११२० रस्त्यांची कामे पूर्ण.

● भारतमाला परियोजने अंतर्गत संत तुकाराम पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, बडोदा-मुंबई जलदगती महामार्ग अशा ४६ हजार ७५२ कोटी रुपयांची रस्तेविकास कामे सुरू.

● विरार- अलिबाग बहुउद्देशीय मार्ग, रेवस-रेड्डी किनारा मार्ग, कोकण हरित महामार्ग, जालना- नांदेड महामार्ग हे महत्त्वाकांक्षी रस्ते विकास प्रकल्प २०२६-२७ पर्यंत पूर्ण होतील.