सोन्याचांदीचा व्यापार सोपविलेल्या भाच्याच्या दुकानात मामा आणि मामेभावांनी संगनमत करून चक्क २ कोटी ६१ लाखांची चोरी केली. विशेष म्हणजे या मामा आणि मामेभावांनी तीन अज्ञात व्यक्तींनी ज्वेलरीचे दुकान लुटल्याचा बनाव रचला. मात्र भाच्याच्या सतर्कतेमुळे या संपूर्ण चोरीचा पर्दाफाश झाला आणि संशयित मामा आणि दोन्ही मामेभाऊ गजाआड झाले. या घटनेत तक्रारदारच चोर निघाले. आरोपींकडून लवकरच मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.

अधिक माहिती अशी, अंधेरीत देवीलाल लोहार यांच्या मालकीचे महावीर ज्वेलर्सचे दुकान आहे. देवीलाल यांचे हे दुकान त्यांचा मामा सोहनलाल किसनजी लोहार आणि त्यांची दोन मुले कमलेश उर्फ निलेश आणि राकेश हे सांभाळत असत. ५ मे २०१८ रोजी निलेश लोहार दुकानात होता. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्ती दुकानात आले आणि त्यांनी निलेशला बेदम मारहाण करत त्याच्या डोळ्यात कीटकनाशक स्प्रे मारून त्याला बांधून ठेवले. या चोरट्यांनी दुकानातील २ कोटी ६१ लाख रुपयांचा १० किलो सोन्याचा ऐवज घेऊन पोबारा केला. निलेशने अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या वेळी दुकानमालक देवीलाल हेही उपस्थित होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. सहा महिने उलटले तरीही पोलिसांना यश मिळत नव्हते. याप्रकरणी कुठलेच धागेदोरे हाती लागत नव्हते. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी खबरी कामाला लावले. पण कुठलीच माहिती मिळत नसल्याने पोलीस आणि दुकानमालक देवीलाल हैराण होते. चोरी होऊन सहा महिने उलटले, त्यामुळे आता हा बनाव १०० टक्के यशस्वी झाल्याचा समज दुकान सांभाळणारे मामा सोहनलाल, निलेश आणि राकेश यांचा झाला.

दरम्यानच्या काळात मामा आणि मामेभावांचे राहणीमान उंचावल्याचे देवीलाल यांच्या निदर्शनास आले. त्यांना या तिघांचा संशय आला. अखेर तपासात कोणतीच प्रगती होत नसल्याने देवीलाल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मामा आणि मामेभावाबाबत संशय व्यक्त केला. पोलिसांनी मामेभाऊ निलेश आणि राकेश यांची वेगवेगळी चौकशी केली. दोघांच्या चौकशीत पोलिसांना मिळालेल्या माहितीत विसंगती होती. त्यांनी तक्रारदार निलेशला पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर त्याने सर्व गुन्हा कबूल करत संगनमताने चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी निलेशचा भाऊ राकेश आणि वडील सोहनलाल या तिघांना अटक केली आहे.

१० किलो सोन्यापैकी काही सोने त्यांनी झवेरी बाजारात विकले होते. तर त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी गहाण ठेवलेले सोने सोडविल्याची कबुली दिली. आरोपी निलेशने सोने विकून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी केल्याचेही सांगितले. केवळ संशयावरून चोरीच्या गुह्याच्या तपासाचे कोडे उलगडले. एमआयडीसी पोलीस आता १० किलो सोने कुठे विकले, त्याचे काय केले याचा शोध घेत आहेत. तो सर्व मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.