मागील दोन महिन्यांपासून गिरणी कामगारांच्या २ हजार ५२१ घरांची सोडत रखडली असून, आता ही सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला होता. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागण्यात आली आहे. मात्र आता राज्यातील राजकीय परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच मुंबई मंडळाच्या सोडतीला मुहूर्त मिळण्याची चिन्हे आहेत.

एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील योजनेतील घरे रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी करोना अलगिकरणासाठी घेतली होती. त्यामुळे ही सोडत रखडली. मात्र म्हाडा आणि एमएमआरडीएने पाठपुरावा करून ही घरे परत मिळविली. ही घरे एमएमआरडीएने म्हाडाला हस्तांतरित केली. म्हाडाने या घरांची १ मे रोजी सोडत काढण्याचे जाहीर केले होते. मात्र घरांच्या दुरुस्तीवरुन म्हाडा आणि एमएमआरडीएमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे १ मे चा मुहूर्त चुकला. मात्र शेवटी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यस्थी करून घरांच्या दुरुस्तीचा वाद मिटवल. त्यानंतर सोडतीची सर्व तयारी पूर्ण करून मंडळाने जूनच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून वेळ मागितली आहे.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांनंतर सोडतीसाठी मुख्यमंत्र्यांकडून वेळ दिला जाण्याची शक्यता होती. पण आता बंडखोरी आणि राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोडत अनिश्चित काळासाठी रखडण्याची चिन्हे आहेत. राजकीय परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच आता सोडत होईल, असे मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गिरणी कामगारांना आणखी काही काळ सोडतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.