पंधरा दिवसांत २० लाख प्रवासी मुंबईतून परराज्यांत

करोना निर्बंधामुळे कामगार मूळ गावी

प्रातिनिधिक

राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर परराज्यातील नागरिक आणि कामगारांनी परतीची वाट धरली असून गेल्या अवघ्या पंधरा दिवसांत २० लाख नागरिकांनी प्रवास केला. पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी १७ लाख नागरिकांनी प्रवास केला आहे, तर मध्य रेल्वेने राज्याबाहेर उत्तर भारतात आणि ईशान्येकडे सुमारे ३ लाख ५० हजार नागरिक गेले आहेत.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पायपीट करावी लागेल या भीतीने निर्बंध कठोर होण्याचे संकेत मिळताच परराज्यातील नागरिक आणि कामगार गावी परतू लागले. १ ते १४ एप्रिल या कालावधीत पश्चिम रेल्वेने राज्याबाहेर जाणाऱ्या २३० गाड्या सोडल्या असून त्यातून १७ लाख नागरिकांनी प्रवास केला. दरम्यान परिस्थती सामान्य असताना २०१९ मध्ये याच काळात लांब पल्ल्याच्या २९० गाड्यांमधून २१ लाख नागरिकांनी प्रवास केला होता. मध्य रेल्वेच्या गाड्यांमधून गेल्या पंधरा दिवसांत ३ लाख ५० हजार प्रवासी उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांत गेले आहेत. याच काळात मध्य रेल्वेने २ लाख नागरिक परराज्यातून महाराष्ट्रात दाखल झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेने मुंबईतून उत्तरेकडील राज्यांमध्ये जाण्यासाठी दरदिवशी सरासरी १८ ते २० गाड्या सोडल्या आहेत. एका गाडीतून साधारणपणे १२०० ते १३०० नागरिकांनी प्रवास केला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये जाण्यासाठी बुधवारी नियमित आणि वि’शेष अशा २६ गाड्या मध्य रेल्वेने सोडल्या होत्या.

तिकिटासाठी प्रतीक्षा

आरक्षण केलेल्या नागरिकांनाच रेल्वेप्रवासाची परवानगी दिली जात आहे. रेल्वे स्थानकाबाहेर आणि प्रतीक्षायादीतील नागरिकांची संख्या पाहून मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यात दरदिवशी वाढ केली जात आहे. मात्र, तरीही प्रवाशांना तिकीटासाठी वाट पाहावी लागत आहे.

राज्यांतर्गत गाड्या रद्द

राज्यांतर्गत प्रवासासाठी असलेल्या गाड्यांना प्रवासी संख्या मर्यादित आहे. अनेक गाड्या रिकाम्या धावत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने राज्यातील विविध भागात जाणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये सीएसएमटी ते गदग, पुणे ते नागपूर, पुणे ते अजनी या गाड्यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षीच्या अनुभवाची धास्ती

गेल्या वर्षी मार्च महिन्यात लागू केलेल्या टाळेबंदीनंतर परप्रांतीय मजूरांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. वाहतूक अचानक बंद करण्यात आल्याने गावी परतण्यासाठीही अनेकांना पायपीट करावी लागली होती. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर अनेकजण काही महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात पुन्हा मुंबईत आले. मात्र सध्या लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे अनेक कारखाने आणि आस्थापना पुन्हा बंद पडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अनेकांचा रोजगार बुडला आहे. कठोर निर्बंध लागू होण्याच्या भीतीने अनेकांनी आधीच गावी जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून परगावी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्थानकांवरील गर्दी ओसरलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 20 lakh migrants from mumbai to foreign countries in 15 days abn