मुंबई : करोनामुळे मुंबईत आणखी २० जणांचा बळी गेला आहे. या मृतांमध्ये १२ रुग्ण ४० ते ६० वयोगटांतील आहेत. चार रुग्णांना कोणताही आजार नव्हता.  तर मुंबईत आणखी ४१७ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांचा एकूण आकडा ६८७४ वर गेला आहे.

मुंबईत चोवीस तासांत ४१७ नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यात ३०७ रुग्णांचे अहवाल हे सरकारी रुग्णालयातील आहेत. तर ११० रुग्णांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेतून पालिकेला मिळाले आहेत. मृतांची संख्या २९० वर गेली आहे.  ४५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १४७२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

धारावीत २५ नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांचा आकडा ३६९ वर गेला आहे. आतापर्यंत धारावीतील १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर माहीममध्ये दोन आणखी रुग्ण सापडले असून एकूण आकडा ३५ वर गेला आहे. धारावीमध्ये पालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन खासगी रुग्णालयांनी करोनाच्या लढाईत सहभाग घेतला आहे. साई रुग्णालय, आयुष रुग्णालय, लाइफ केअर, फॅमिली केअर या रुग्णालयांनी तपासणी, उपचार सुरू केले आहेत.

रक्तद्रव उपचार केलेल्या रुग्णाचा मृत्यू

मुंबई: शहरात प्रथमच रक्तद्रव उपचार (प्लाझ्मा थेरपी) करण्यात आलेल्या ५३ वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा लीलावती रुग्णालयात बुधवारी मध्यरात्री मृत्यू झाला.या रुग्णाला २० एप्रिलला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. फुप्फुसाच्या संसर्गासह श्वसनाचा तीव्र त्रास होत असल्याने रुग्णाला दाखल केल्यापासून कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते.  २५ एप्रिलला रक्तद्रव उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली. मात्र, श्वसनाचा त्रास गंभीर आणि रक्तामध्ये संसर्ग प्रसार झाल्याने त्यांचा बुधवारी रात्री मृत्यू झाला.

ठाणे जिल्ह्य़ात ७२ नवे रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ामध्ये गुरुवारी दिवसभरात ७२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून यामुळे जिल्ह्य़ातील रुग्णांचा आकडा ९३९ इतका झाला आहे. ठाणे आणि नवी मुंबई शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले असून या दोन्ही शहरात अनुक्रमे ३१ आणि २४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच ठाण्यात करोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.  गुरुवारच्या आकडेवारीनुसार ठाणे ३१, कल्याण-डोंबिवली ६, भिवंडी १, अंबरनाथ १, बदलापूर ४, मिरा-भाईंदर ५, नवी मुंबई २४ असे ७२ नवे रुग्ण आढळले आहेत.