महावितरण कंपनीने सर्व वीज ग्राहकांचे कंबरडे मोडणारा सहा ते आठ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यातून छुप्या पद्धतीने २० टक्के दरवाढ लादली जाणार असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे. त्यामुळे उद्योग मृत्युपंथाला लागतील किंवा राज्याबाहेर जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ची स्वप्ने कागदावरच राहतील आणि राज्याची वाटचाल विनाशाकडे सुरू होईल, असे टीकास्त्र होगाडे यांनी सोडले आहे.
महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे दरवाढीचा प्रस्ताव सादर केला असून त्यात सहा ते आठ टक्के दरवाढ मागितल्याचे सांगितले जात आहे. पण १२-१३ टक्के इंधन समायोजन आकार वीज दरात समाविष्ट करण्यात आल्याने प्रत्यक्षात २० टक्के दरवाढ होईल. सध्या सरकारी वीजपुरवठा दर सहा रुपये तीन पैसे प्रतियुनिट असून आता सरासरी सात रुपये १५ पैसे ते सात रुपये २५ पैसे प्रतियुनिट दराने वीजदरवाढीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना विजेचा मोठा झटका बसणार आहे.