मुंबई : तरूणांमध्ये सध्या जीमची क्रेझ वाढत चालली. उत्कृष्ट शरीरयष्ठीसाठी अनेक जण जीममध्ये अतिरिक्त व्यायाम करतात. वेटलिफ्टिंगसारख्या ताकदीच्या व्यायामामुळे सध्या २५-३५ वयोगटातील तरुणांमध्ये हर्नियाची समस्या वाढलेली दिसून येत आहे. तरुणांमध्ये हार्नियाच्या त्रासात जवळपास २० टक्के वाढ दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे वजन उचलण्यासह विविध प्रकारचा व्यायाम करणाऱ्या प्रौढांमध्ये हा त्रास होताना दिसून येतो, असे तज्ज्ञांच्या मते आहे. तरुणांनी जिममध्ये वेट लिफ्टिंग करण्यापूर्वी वॉर्म अप करणे अत्यावश्यक आहे. खूप जास्त वजन उचलू नयेत. तीव्र वेदना जाणवत असेल तर व्यायाम बंद करून प्रथम वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. हर्निया ही एक समस्या आहे, जी लहान मुलांपासून निरोगी तरुण प्रौढांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांना प्रभावित करू शकते.आरोग्याबाबत जागरूक तरुण तसेच प्रौढांना नियमित व्यायाम आणि जिममध्ये जाण्याची सवय असते. अशा तरूणांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. इनग्विनल हर्निया हा मांडीचा हर्निया असतो. सामान्यत: जेव्हा पोटाच्या ऊती खालच्या ओटीपोटाच्या भिंतीमधून आपल्या मांडीचा सांधामध्ये घुसतात तेव्हा तीव्र वेदना जाणवतात. मांडीच्या भागात दाब किंवा जडपणा, ओटीपोटात दुखणे आणि वजन उचलताना त्रासदायक वेदना ही या हर्नियाची लक्षणे आहेत. आणखी वाचा-निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधी पालिकेच्या दारी, विभागातील विविध समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांनी सांगितले की, साधारणपणे २५ ते ३५ वयोगटातील तरुणवर्ग शरिरसौष्ठवाच्या नादात अतिरिक्त वजन उचलतात. यासाठी योग्य ती सावधानता बाळगळणे गरजेचे असते अन्यथा हार्नियाचा त्रास होऊ शकतो. आमच्या रुग्णालयात गेल्या काही वर्षात हार्नियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत असून यामागे वेगवेगळी कारणे आहेत. तथपि तरुणांमध्ये हा त्रास उद्भविण्यामागे व्यायामाबाबत योग्य ती जाणीव व काळजी न घतल्यामुळे त्रास उद्भवल्याचे दिसून येते. महापालिकेच्या कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील शल्यविशारद व डीएनबी अध्यापक डॉ राजेश मोरे यांच्या म्हणण्यानुसार तरुणवर्गामध्ये अलीकडच्या काळात हार्नियाचा त्रस वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्षे बैठे वा बौद्धिक काम करणारी मंडळी निवृत्तीनंतर मशिनवर चालणे तसेच वजन उचलण्याचा व्यायाम सुरु करतात, या मंडळींमध्येही हार्नियाचा त्रास आढळून येतो. मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील लेप्रोस्कोपिक शल्यविशारज डॉ. लकीन विरा म्हणाले की, जीममध्ये जाणाऱ्या तरूणांमध्ये सध्या हर्नियाची समस्या वाढताना दिसून येत आहे. २५-३५ वर्ष वयोगटातील प्रौढांमध्ये इनग्विनल हर्नियाच्या प्रकरणांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या १० पैकी ३-४ जणांना जिममध्ये जास्त वजन उचलल्यामुळे हर्निया झालेला आहे. त्यामुळे जिममध्ये वजन उचलताना सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. व्यायामशाळेत जाणाऱ्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंगपूर्वी व्यवस्थित वॉर्म अप करणे आवश्यक आहे. वेट लिफ्टिंग करताना घाई करू नका, बेल्ट वापरा, ॲब्स मजबूत करा, जड वजन उचलणे टाळा आणि वेदना झाल्यास ताबडतोब थांबा. हर्नियाची समस्या जाणवत असल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ला घ्या. हर्नियाच्या समस्येवर लॅप्रोस्कोपिक इनग्विल हर्निया रिपेअर ही एक शस्त्रक्रिया आहे. आणखी वाचा-अटल सेतूतील जोडरस्त्यावरील तडे प्रकरण : अखेर कंत्राटदाराला एक कोटी रुपये दंड तरुणांमध्ये व्यायामाची आवड एसणे ही चांगली गोष्ट आहे. तथापि जीममध्ये जाऊन वेट लिफ्टिंग करण्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे हर्नियाचे प्रमाण वाढले आहे. अयोग्य तंत्रे आणि जास्त वजनामुळे एखाद्याला हर्नियासारख्या दुखापती होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा जीममध्ये वजन उचलण्याचा व्यायाम करताना योग्य सावधानता न बाळगल्यामुळे ही समस्या उद्धवते. जीममध्ये अतिरिक्त वजन उचलल्यामुळे प्रौढांमध्ये सध्या हर्नियाचं प्रमाण १५ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे जिममध्ये व्यायाम करताना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक असल्याचे झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील लेप्रोस्कोपिक शल्यविशारद डॉ. हेमंत पटेल म्हणाल्या.