मुंबई : तंबाखू सेवनामुळे कर्करोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे टाटा रुग्णालयाने पाच वर्षांपूर्वी हाती घेतलेल्या ‘तंबाखू क्विट लाईन’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये या उपक्रमांतर्गत २० हजार नागरिक तंबाखूच्या व्यसनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार फेब्रुवारी २०१९ मध्ये ‘तंबाखू क्विट लाईन’ उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमांर्गत तंबाखूचे सेवन करणाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येत असून त्यांना तंबाखू सेवनापासून दूर राहण्यासाठी मदत करण्यात येत आहे. देशामध्ये सुरू करण्यात आलेल्या चार ‘तंबाखू क्विट लाईन’ केंद्रांपैकी एक केंद्र खारघर येथील टाटा रुग्णालयाच्या ॲक्ट्रेक्ट केंद्रामध्ये आहे. यासाठी ॲक्ट्रेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

हेही वाचा – मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं, मंत्रालयासमोरची घटना

महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि दिव-दमण येथील नागरिकांच्या समुपदेशानची जबाबदारी या केंद्रावर आहे. अन्य तीन ‘क्विट लाईन’ केंद्रे दिल्ली, गुवाहाटी आणि बंगळूरू येथे आहेत. ‘तंबाखू क्विट लाईन’वर संपर्क साधण्यासाठी नागरिकांना मदत क्रमांक १८००११२३५६ उपलब्ध करण्यात आला आहे.

हेही वाचा – रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा मोबाइल हिसकावून चोरांचा पोबारा

‘क्विट लाईन’चे काम दोन पाळ्यांमध्ये चालते. तसेच या केंद्रांवर नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी १६ तज्ज्ञांची तुकडी कार्यरत आहे. या मदत क्रमांकावर दररोज एक हजाराहून अधिक दूरध्वनी येत असल्याची माहिती टाटा मेमोरियल केंद्राच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजीचे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांनी दिली. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयात जायचे नसते. त्यामुळे तंबाखू सेवनाची सवय सोडण्यासाठी दूरध्वनी हे एक प्रभावी माध्यम आहे. तंबाखूच्या सेवनाच्या सवयीमुळे गंभीर आजार जडू शकतात. त्यामुळे ही सवय सोडण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांची मदत घेण्याचा सल्ला देण्यात येतो, असे क्विटलाइनचे प्रभारी आणि एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक डॉ. अतुल बुदुख यांनी सांगितले.