scorecardresearch

धावत्या रेल्वेत तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, मुंबईमधील धक्कादायक घटना

रविवारी दुपारी एकच्या सुमारास भरधाव रेल्वेत एका २० वर्षीय तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

प्रातिनिधीक फोटो

रविवारी दुपारी एकच्या सुमारास भरधाव रेल्वेत एका २० वर्षीय तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. संबंधित तरुणी स्वराज एक्स्प्रेसमधील वॉशरूम कोचमध्ये गेली होती. पण बराच काळ उलटूनही ती परत आली नाही. या प्रकारानंतर आसपासच्या प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी संबंधित कोचचा दरवाजा उघडला असता, २० वर्षीय तरुणी लटकलेल्या अवस्थेत आढळली आहे.

तिच्या गळ्याभोवती एक कपडा गुंडाळलेला होता. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर रेल्वेत एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास डहाणू रोड आरएस येथे स्वराज एक्स्प्रेस रेल्वेला विशेष थांबा देण्यात आला आणि याठिकाणी तरुणीचा मृतदेह उतरवण्यात आला, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रेल्वे मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी कटरा (SVDK) पर्यंत जाणार होती. दरम्यान रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास धावत्या रेल्वेत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. रेल्वे थांबवल्यानंतर तिला तातडीने डहाणू कॉटेज रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे संबंधित तरुणीसोबत एक व्यक्ती आणि लहान मुलगा बोरीवलीपासून सोबत प्रवास करत होते. पण ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यापासून दोघंही फरार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. धावत्या रेल्वेत हा धक्कादायक प्रकार घडल्याने प्रवशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 20 years old woman found hanging in swaraj express train at dahanu boriwali rmm