मुंबई : ठाणे उपपरिसर आणि स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अप्लायड सायन्सेस, कल्याण येथे यशस्वीरित्या सौर ऊर्जा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर आता कलिना संकुलात २०० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला सुरुवात होत आहे. कलिना संकुलातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, फिरोजशाह मेहता भवन, सी. डी. देशमुख भवन, जुने लेक्चर कॉम्प्लेक्स, लाईफ सायन्स इमारत, मौलाना अब्दुल कलाम भवन आणि जीवभौतिकशास्त्र विभागात पूर्णतः अक्षय उर्जेचा वापर केला जाणार आहे.

कलिना संकुलात पहिल्या टप्प्यात २०० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. यामुळे कॅम्पसचा मोठा भाग अक्षय ऊर्जा स्रोतांवर चालणार असून वार्षिक वीज खर्चात लक्षणीय बचत होईल. पर्यावरणाच्या दृष्टिने कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा हेतूही साध्य होईल. या सातही इमारतींमध्ये सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीजेपोटी होणाऱ्या खर्चात महिन्याला ४ लाख रुपयांहून अधिक बचत होईल. २०० किलोवॅट क्षमतेच्या या सौर प्रकल्पामध्ये नेट मीटरिंग प्रणाली आहे.

या प्रणालीच्या माध्यमातून इमारतींना सौर उर्जा मिळणार असून या प्रणालीतील नेट मीटर सिस्टमसह सौर पॅनेल आणि इन्व्हर्टर समाविष्ट असल्याने अतिरिक्त उर्जाही विकसित करून त्याचे नियोजन केले जाणार आहे. साधारणपणे २०० किलोवॅट सोलर पॅनल प्रणालीचा उपयोग करून प्रतिवर्षी २ लाख ६० हजार युनिट वीज निर्मिती निर्माण करण्यात येणार आहे. सौर ऊर्जेवर आधारित विद्युत प्रकल्प उभारण्यासाठी मुंबई विद्यापीठाने कॉमेट इंडिया आणि युनाटेड वे मुंबई या दोन संस्थांसोबत सामंजस्य करार केला.

प्लास्टिक बॉटल श्रेडिंग यंत्र

कलिना परिसरात पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून कॅम्पसमध्ये प्लास्टिक बॉटल श्रेडिंग यंत्र बसवण्यात आले आहे. वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या पुनर्वापरासाठी थेट वर्गीकृत स्वरूपात देण्यास या यंत्राचा उपयोग होणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील प्लास्टिक कचऱ्यावर प्रभावी नियंत्रण मिळणार असून पर्यावरणपूरक सवयींना प्रोत्साहन मिळणार आहे. ‘ग्रीन कॅम्पस’च्या धर्तीवर विद्यापीठाने शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

मुंबई विद्यापीठाची हरित उर्जेकडे वाटचाल पर्यावरण-संवर्धन, अक्षय ऊर्जा वापर आणि शाश्वत विकास या तिन्ही क्षेत्रांमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. पुढील काळात विद्यापीठ परिसर अधिक पर्यावरणस्नेही बनविला जाणार आहे. सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प आणि पर्जन्यजल संधारणाच्या सुविधांमुळे विद्यापीठ परिसर अधिक शाश्वत स्वरूपात विकसित होईल. पर्यावरण जनजागृतीसाठी क्लायमेट स्कील प्रोग्राम्स हाती घेण्यात आले आहेत.

– प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ