scorecardresearch

राज्यपाल-सत्ताधाऱ्यांमधील वादामुळे २०० पोलीस राष्ट्रपती पदकांपासून वंचित

महासंचालकांच्या प्रस्तावानुसार गृहमंत्रालय राज्यपालांची वेळ घेतात.  त्यानंतर पदकविजेत्यांच्या कुटुंबीयांसमवेत राजभवनावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई: प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालय देशभरातील पोलिसांना शौर्यासाठी आणि उल्लेखनीय प्रशासकीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करीत असते. राज्यपालांच्या हस्ते या पदकांचे वितरण होते. मात्र राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात हा कार्यक्रमच होऊ न शकल्याने सुमारे २०० पोलिसांना जाहीर झालेल्या राष्ट्रपती पोलीस पदकाच्या सन्मानापासून वंचित राहावे लागत आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्य पदक तसेच प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदके जाहीर केली जातात. त्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या पदक वितरण कार्यक्रमाची आखणी होते.

महासंचालकांच्या प्रस्तावानुसार गृहमंत्रालय राज्यपालांची वेळ घेतात.  त्यानंतर पदकविजेत्यांच्या कुटुंबीयांसमवेत राजभवनावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सन २०१९ मध्ये प्रजासत्ताक दिनाला ४०, तर स्वातंत्र्य दिनाला ३९, पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली होती. अशाच प्रकारे सन २०२० आणि २०२१ मध्येही प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाला मिळून सुमारे २०० पदके राज्यातील पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना जाहीर झाली आहेत, तर येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आणखी ४० पदके जाहीर होण्याची शक्यता

आहे. राष्ट्रपती पदक हे प्रत्येक पोलिसासाठी मोठा गौरव आणि अभिमानाची बाब असते. त्यामुळे पदक जाहीर झाल्यानंतर काही काळात राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होते. मात्र सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष तसेच पोलीस दलात गेल्या काही महिन्यांतील गोंधळाची परिस्थिती यामुळे या पदक वितरण सोहळ्याकडे कोणाचेच लक्ष गेलेले नाही. त्यामुळे पदकविजेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार सिंह यांच्याशी संपर्क साधला असता,गेल्या दोन वर्षांत करोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नसल्याचे सांगितले. या कार्यक्रमास पदक विजेते व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने येत असतात. पण करोना असल्याने हा कार्यक्रम होऊ शकलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

हा कार्यक्रम झालेला नसल्याचा विषय आपल्यापर्यंत आलेला नाही. मात्र त्वरित माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. – दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 200 policemen deprived of president medals due to dispute between governors and authorities akp