मुंबई : यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे जाणाऱ्या एसटीच्या नियमित बसगाडय़ांबरोबरच जादा गाडय़ांचेही आरक्षण मोठय़ा प्रमाणात झाले आहे. एसटीच्या जादा गाडय़ा मराठवाडा, खान्देश, विदर्भ आदी भागांतून कोकणाकडे वळवतानाच त्यासोबत जादा चालकांची कुमकही मागवण्यात आली आहे. या भागांतील दोन हजार चालक कोकणासाठी रवाना होणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहतुकीची धुरा सांभाळणार आहेत. कोकणातील रस्ते, घाट यापासून काही चालक अनभिज्ञ असल्याने त्यांना बस सुरक्षितरीत्या चालवण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत.

मुंबई, ठाणे, बोरीवली, पालघर आदी भागांतूून सुमारे दीडशे नियमित बसगाडय़ा कोकणाकडे रवाना होतात. त्याशिवाय गणेशोत्सवासाठी अडीच हजार जादा गाडय़ा सोडण्याची घोषणा एसटी महामंडळाने केली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील गाडय़ांचा वापर करतानाच पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती प्रदेशातील बुलढाणा विभाग, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातूनही जादा गाडय़ा मागविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एसटीच्या नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव येथून ५७५ गाडय़ा, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी भागांतून ७२५, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली आदी भागांतून ६५० जादा गाडय़ा टप्प्याटप्यांत कोकणासाठी रवाना केल्या आहेत. तर बुलढाणा विभागातून ५० बसची सेवाही आहे. या गाडय़ा दाखल होतानाच त्यासोबत प्रत्येकी एक चालकही दाखल झाले आहेत. असे दोन हजार चालक एसटीच्या जादा गाडय़ाच्या वाहतुकीची जबाबदारी सांभाळणार आहेत.

गस्ती पथकांकडून लक्ष वाहतुक करताना पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील विशेषत: कशेडी घाटात वाहन सुरक्षित चालवण्यात यावे, अशा सूचना एसटी महामंडळाकडून चालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच एसटी महामंडळाकडून मार्ग तपासणी व गस्ती पथकही तैनात करण्यात आले असून त्यांना मद्यपान चाचणी उपकरणेही उपलब्ध करण्यात आली आहेत. तपासणीअंती मद्यपान केल्याचे आढळल्यास त्या चालकाला जागेवरच निलंबित करण्यात येणार आहे. तसेच तो चालक ज्या आगाराचा असेल त्या आगार प्रमुखावरही कारवाई केली जाणार आहे.