scorecardresearch

युक्रेनमधून २१९ भारतीय सुखरुप परत

विमानतळाबाहेर पडताच नातेवाईकांनी विद्यार्थ्यांना गराडा घातले. तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

मुंबई : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धस्थितीमुळे जीव टांगणीला लागलेले तेथील भारतीय नागरिक आणि त्यांचे भारतातील हवालदिल नातेवाईक यांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला. युक्रेनमधील २१९ भारतीय नागरिकांना घेऊन आलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे सुरक्षित अवतरण शनिवारी रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी मुंबई विमानतळावर झाले.

विमानतळाबाहेर पडताच नातेवाईकांनी विद्यार्थ्यांना गराडा घातले. तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या नातवंडांना घेण्यासाठी विमानतळावर पोहोचलेल्या  आजी-आजोबांनी त्यांची गळाभेट घेत आनंद साजरा केला.

युक्रेनवरून परतलेले बहुतांशी नागरिक हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते. युद्धस्थितीपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला नसला तरी  युद्धाच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या. त्यांचे भारतातील नातेवाईक सतत दूरध्वनीवरून संपर्कात होते. युद्धस्थितीपासून काही अंतरावर असलेले विद्यार्थी सुरक्षित होते; मात्र त्यांनी काही प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकल्याचा अनुभव सांगितला.

युक्रेनमध्ये सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे भारतात परतल्यानंतरही शिक्षणात खंड पडणार नसल्याने याबाबतीत विद्यार्थी निर्धास्त आहेत. युक्रेनच्या सीमेजवळ युद्ध सुरू असल्याने तेथील विद्यार्थ्यांना लष्करी तळावर हलवण्यात आले आहे.

पुण्याचा आविष्कार मुळे चेर्नीवर्स शहरात शिक्षणासाठी गेला होता. त्याच्या राहत्या ठिकाणापासून ४० किमी अंतरावर रोमानिया विमानतळ होते. भारतीय दूतावासाच्या निर्देशानुसार चेर्नीवर्स शहरातील विद्यार्थी तासाभराचे अंतर पार करून रोमानियापर्यंत पोहोचले. तेथे स्थानिक रोमानी नागरिकांनी भारतीय विद्यार्थ्यांना बरेच सहकार्य केले. त्यांना जेवण पुरवले, अशी माहिती आविष्कार याने दिली. भारतीय नागरिकांना घेण्यासाठी विमाने पोहोचली असली तरी स्थानिक युक्रेनी नागरिकांना कुणीही वाली उरलेला नाही. तेही इतरांप्रमाणे जीव वाचवण्यासाठी देशातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. विमानतळावर जमलेल्या युक्रेनी नागरिकांच्या गर्दीने तेथील रस्ते तुडुंब भरले असल्याचे भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

विमानतळावर चोख व्यवस्था

भारतात परतल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांकडे आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र होते त्यांना प्रमाणपत्राच्या आधारे सोडण्यात आले. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नव्हते त्यांची करोना चाचणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करता यावा यासाठी वायफायचा सांकेतांक देण्यात आला होता. त्यांच्यासाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विमानतळावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले.  तत्पूर्वी या विद्यार्थ्यांसाठी अन्न, त्यांची आरोग्य तपासणी, त्यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या मदतकक्ष व इतर सुविधांची माहिती घेतली.

मुंबई विमानतळावर  विमानातून विविध राज्यांचे विद्यार्थी मुंबईत दाखल झाले. तमिळनाडू आणि केरळ सरकारचे कर्मचारी त्यांच्या राज्याचे रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आले होते.

स्वागताला केंद्रीय मंत्री

मायदेशी परतलेल्या भारतीय नागरिकांचे स्वागत करण्यासाठी केंद्रीय मंत्री पियूष गोयल विमानतळावर उपस्थित होते.

 भारतीय विद्यार्थ्यांबाबत पंतप्रधान चिंतेत होते. परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास दिसून आला. भारतीय दूतावासाचे कर्मचारी, एअर इंडियाचे कर्मचारी यांनी त्यांची व्यवस्थित काळजी घेतली, असे गोयल  म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 219 indians return safely from ukraine at mumbai airport akp

ताज्या बातम्या