मुंबई : मुंबई महापालिका आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. तसेच आरोग्य सेविकांना एक पगार म्हणजेच नऊ हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत कामगार संघटनांची गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत यावेळी चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेचे ९३ हजार आणि बेस्टचे २९ हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस मिळणार आहे. आरोग्य सेविकांना एका महिन्याच्या पगाराइतका बोनस मिळावा अशी मागणी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने केली होती. त्यानुसार आरोग्य सेविकांना नऊ हजार रुपये बोनस मिळणार आहे. गेल्यावर्षी आरोग्यसेविकांना पाच हजार रुपये बोनस मिळाला होता. यंदा त्यात भरघोस वाढ केली आहे. तर विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना यंदा पूर्ण बोनस मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्यावर्षी  कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस दिला होता. यावर्षी या रकमेत वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर २०० कोटींहून अधिकचा भार येणार आहे. बैठकीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठीची ‘श्रमसाफल्य’ आणि ‘आश्रय’ या योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विविध विकास यंत्रणांना सोबत घेऊन अशी घरे मोठय़ा संख्येने उपलब्ध व्हावीत यासाठी स्वतंत्र समन्वय बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दिवाळी बोनसची मागणी आणि त्यातील वाढीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिकेच्या सर्वपक्षीय अशा कर्मचारी संघटनाना विश्वासात घेऊन बैठक घेतली. त्याबद्दल आणि बोनससाठी विविध घटकांचा सहानुभूतीने विचार केल्याबद्दल उपस्थित संघटना पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

कामगार सेनेची अनुपस्थिती

बैठकीस खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी तसेच संदिप देशपांडे, संतोष धुरी, दि म्युनिसिपल युनियनचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस रमाकांत बने, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अ‍ॅड. प्रकाश देवदास, उत्तम गाडे, अशोक जाधव यांच्यासह पालिकेच्या विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी, विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते. मात्र कामगार सेनेचे प्रतिनिधी या बैठकीला हजर नव्हते.

करोना साथीच्या बिकट परिस्थितीत मुंबई पालिका कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. विकासकामांवर खर्च केलाच पाहिजे, पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांनी आनंदात दिवाळी साजरी करा, पण  मुंबईकरांसाठी मनापासून काम करा.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22500 rupees bonus municipal employees chief minister eknath shinde announcement nine thousand health workers ysh
First published on: 30-09-2022 at 01:16 IST