scorecardresearch

‘बेस्ट’ प्रवासातील फुकटय़ांत वाढ ; २३ हजार ९७२ विनातिकीट प्रवासी

बेस्ट प्रशासनाने तर सुरू केलेल्या विनावाहक सेवेचाही काही जण गैरफायदा घेतात.

मुंबई : उपनगरीय रेल्वेबरोबरच आता बेस्ट बसमधूनही विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. शिथिल झालेले निर्बंध, वाढलेली प्रवाशी संख्या आणि धावत असलेल्या विनावाहक बससेवांचा गैरफायदा फुकटे प्रवासी घेत आहेत. २०२१ मध्ये २३ हजार ९७२ विनातिकीट प्रवासी आढळले असून २०२०च्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे.

विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी अनेकदा सराईतपणे हात दाखवून ‘पास’ असे म्हणत निसटण्याचा प्रयत्न करतात. गर्दीच्या बसमध्ये चढलेले अनेक प्रवासी दरवाज्याजवळ उभे राहून तिकीट काढल्याशिवायच आपल्या थांब्यावर उतरण्याचा प्रयत्न करतात. काही प्रवासी गर्दीच्या वेळी वाहकाकडून मुद्दाम तिकीट घेत नाहीत आणि आपल्या थांब्यावर उतरून जातात. या सर्वच प्रवाशांना पकडून दंड वसूल करण्याचा प्रयत्न तिकीट तपासनीसांच्या माध्यमातून ‘बेस्ट’ करत असते. मात्र प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही.

बेस्ट प्रशासनाने तर सुरू केलेल्या विनावाहक सेवेचाही काही जण गैरफायदा घेतात. यात बसमध्ये वाहक नसून बस थांब्यावरच उभ्या असलेल्या वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते. मधल्या थांब्यावर गर्दीच्या वेळी काही प्रवासी वाहकाची नजर चुकवून बसमध्ये प्रवेश करतात व सर्रास विनातिकीट प्रवास करतात. तर काही वेळा बस थांब्यावरच तिकीट देण्यासाठी वाहक उपलब्ध नसल्याने शेवटचा थांबा येईपर्यंत प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही. त्यामुळे विनातिकीट प्रवासी संख्येत आणखी भर पडते.

बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, तिकीट तपासनीसांनी केलेल्या कारवाईत २०२० मध्ये ११ हजार ४६९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. २०२१ मध्ये या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या वर्षांत २३ हजार ९७२ विनातिकीट प्रवासी आढळल्याची माहिती उपक्रमाने दिली. यातून लाखो रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षांत १४ लाख ३९ हजार ५८० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याआधीच्या वर्षी ६ लाख ५३ हजार रुपये दंड जमा झाला होता.

बेस्ट उपक्रमाकडून ११० बस मार्गावर ८०९ बसमध्ये १४ हजार २६२ फेऱ्या विनावाहक चालवण्यात येतात. मात्र काही थांब्यावर वाहक नसल्याने प्रवासी विनातिकीट प्रवास करीत आहेत.

‘बेस्ट’च्या ‘चलो अ‍ॅप’ला ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ची जोड

करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि बेस्ट बसगाडय़ांमधून संपर्कविरहीत तिकीटाची देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने बेस्ट उपक्रमाने ‘चलो मोबाईल अ‍ॅप’सोबत ‘युनिव्हर्सल वाहतूक पास’ जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा आज गुरुवार, २० जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे. प्रवासी तिकीट खरेदी करण्यासाठी बेस्टच्या ‘चलो अ‍ॅप’चा वापर करताना युनिव्हर्सल पाससोबत जोडला जाऊन त्याची पडताळणी तिकीट मशिनद्वारे आपोआप केली जाईल. त्यासाठी प्रवाशांना युनिव्हर्सल पास प्रत्यक्षात जवळ बाळगण्याची आवश्यक्ता नाही. रोख रक्कमेद्वारे अथवा स्मार्ट कार्डद्वारे तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशाला युनिव्हर्सल पास, बस वाहकाला दाखविणे बंधनकारक राहणार असल्याचे बेस्ट उपक्रमाने सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 23 thousand 972 ticketless commuters caught in best buses zws