२३ हजार वाहन ‘लायसन्स’ पुन्हा आरटीओत जमा

वाहनाचे लायसन्स हवे असल्यास त्या व्यक्तीला शिकाऊ लायसन्स काढावे लागते. ते लायसन्स त्वरित मिळते.

करोनामुळे अन्यत्र स्थलांतर, प्रतिबंधित क्षेत्रासह अन्य कारणांमुळे फटका; आरटीओ व टपाल खात्यासमोर डोके दुखी

मुंबई : कायमस्वरूपी नवीन वाहन लायसन्स (अनुज्ञप्ती) घरपोच सुविधा देण्याचे काम आरटीओ आणि टपाल खात्याकडून केले जाते; परंतु करोनाच्या सुरुवातीच्या काळात अनेकांनी अन्यत्र के लेले स्थलांतर, तसेच प्रतिबंधित क्षेत्र, चालक घरी उपलब्ध नसणे इत्यादी कारणांमुळे २३ हजारांहून अधिक लायसन्स पुन्हा आरटीओत जमा झाली आहेत. आरटीओत जमा झालेली लायसन्स मिळविण्यासाठी चालकाला काही शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा आरटीओ व पोस्ट कार्यालयामार्फत संबंधित व्यक्तीच्या घरी लायसन्स पाठविण्यात येणार आहे. परिणामी या वेळी आरटीओ आणि टपाल कार्यालयालाही दुप्पट मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

वाहनाचे लायसन्स हवे असल्यास त्या व्यक्तीला शिकाऊ लायसन्स काढावे लागते. ते लायसन्स त्वरित मिळते. त्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी संपताच चालकाला कायमस्वरूपी लायसन्स मिळवण्यासाठी वाहन चाचणी परीक्षा द्यावी लागते. त्यात उत्तीर्ण होताच लायसन्स टपाल कार्यालयामार्फत घरपोच दिले जाते. साधारण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सात ते दहा दिवसांत लायसन्स चालकाला मिळणे अपेक्षित असते.

एखादा चालक किंवा त्याचे

कुटुंबीय घरी नसणे, तसेच राहत्या ठिकाणी पुनर्विकास होत असल्याने अन्यत्र भाडय़ाने जाणे इत्यादी कारणांमुळे चालक सापडत नाही आणि लायसन्स टपाल कार्यालयाकडून पुन्हा आरटीओत जमा करावे लागते. लायसन्स घेण्यासाठी चालक येतात का त्याची प्रतीक्षा के ली जाते. चालक

लायसन्स घेण्यासाठी आल्यावर त्याला ५० रुपये शुल्क भरावे लागते आणि ते लायसन्स नियमानुसार टपाल कार्यालयामार्फतच घरपोच के ले जाते.

कारणे काय?

महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षी करोनाकाळातच लायसन्स पुन्हा आरटीओत जमा झाली आहेत. चालक किंवा कुटुंबीय घरी नसणे, पत्ता बदलला असणे आदी कारणे आहेत. करोनाकाळात आपल्या गावी जाऊन राहणाऱ्यांचीही संख्या अधिक होती. शिवाय पोस्टमनला (टपालवाहक) इमारतीत प्रवेश न मिळणे, प्रतिबंधित क्षेत्रामुळे अडचणी येणे ही कारणेही लायसन्स परत आरटीओत जमा होण्यासाठी कारणीभूत ठरली आहेत.

अंधेरी, ताडदेव आरटीओत सर्वाधिक संख्या

  • एप्रिल २०२० पासून ते जून २०२१ पर्यंत मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी व बोरिवली आरटीओत लायसन्स जमा झालेल्यांची एकू ण संख्या २३ हजारांपेक्षा जास्त आहे.
  • अंधेरी आरटीओत जमा झालेल्या एकू ण सात हजार ६९९ लायसन्सचा त्यात समावेश आहे.
  • जवळपास तीन हजार ९०० पेक्षा जास्त लायसन्सवर दावा करण्यात आलेला नाही. तर पाच लायसन्सची मुदतच उलटली आहे. याशिवाय संबंधित व्यक्ती न सापडणे अथवा अन्य काही कारणांमुळेही लायसन्स आरटीओत पडून राहिली आहेत.
  • ताडदेव आरटीओत हीच संख्या सात हजार ६९६ आहे.
  • वडाळा आरटीओत दोन हजार ६६८ आणि बोरिवली आरटीओतही पाच हजार ७८ लायसन्स  परत जमा झाली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 23000 vehicles licenses re deposited in rto ssh