मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक १०, ११, १२ आणि १३ वर सध्या १३ ते १७ डब्यांच्या एक्सप्रेस थांबा घेऊ शकतात. परंतु, आता या फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले असून डिसेंबर अखेपर्यंत सीएसएमटीवरून २४ डब्यांच्या एक्सप्रेस धावतील, असा विश्वास मध्य रेल्वेकडून व्यक्त केला जात आहे.
सीएसएमटीवर एकूण १८ फलाटे असून ७ फलाटे ही लोकलसाठी आणि ११ फलाटे ही लांब पल्ल्यांच्या गाडय़ांसाठी आहेत. या ११ फलाटांपैकी फलाट क्रमांक १०, ११, १२ आणि १३ची लांबी कमी असल्याने २४ डब्यांच्या एक्सप्रेस उभ्या राहू शकत नाहीत. फलाट क्रमांक १० आणि ११ वर १३ डब्यांच्या एक्स्प्रेस आणि फलाट क्रमांक १२ आणि १३ वर १७ डब्यांच्या एक्सप्रेस उभ्या राहू शकतात. त्यामुळे या चारही फलाटांची लांबी वाढवण्याचे काम हाती घेतले आहे.




हे काम पूर्ण झाल्यानंतर, या सर्व फलाटांवर २४ डब्यांची एक्सप्रेस उभी राहू शकतील. यासह मध्य रेल्वेवरून कोकणात, दक्षिण आणि उत्तर भारतात जाणाऱ्या एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ होणार आहे. परिणामी, अधिक प्रवाशांची वहन क्षमता सामावून घेता येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सीएसएमटीवरून दररोज ९० लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावतात. चार फलाटांचे विस्तारीकरण पूर्ण झाल्यास इतर टर्मिनसवरील एक्सप्रेसची वाहतूक सुरळीत करणे सोयीस्कर होणार आहे. तसेच मुंबई ते पुणे धावणाऱ्या एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ करता येणे मध्य रेल्वेला शक्य होणार आहे.
विस्तारीकरण असे होणार..
फलाट क्रमांक १० आणि ११ची लांबी २९८ मीटर असून ती आता ६८० मीटपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. तर, फलाट क्रमांक १२ आणि १३ ची लांबी ३८५ मीटर असून ती ६९० मीटपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
फलाट विस्तारीकरणाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच या कामानंतर ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची कामे केली जाणार आहेत. डिसेंबरअखेपर्यंत चारही फलाटांचे विस्तारीकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. – डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे