प्रत्येक विभागात तैनात राहणार

मुंबई : दाटीवाटीच्या वस्त्या, झोपडपट्ट्या, चिंचोळे रस्ते यामधून मार्ग काढून दुर्घटनेच्या ठिकाणी जाण्यास अग्निशमन दलाच्या गाड्यांना पोहोचणे मुश्कील होत असल्यामुळे पालिकेने आता अग्निशमनासाठी २४ दुचाकी घेण्याचे ठरवले आहे. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन वाहनांना दुर्घटनास्थळी प्रतिसाद देण्यास लागणारा वेळ कमी करण्याकरिता या दुचाकी घेण्यात येणार आहेत.

वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात वाहनांची संख्या वाढली असून रस्त्यावरील वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन वाहनांना दुर्घटनेच्या ठिकाणी जाण्यास वेळ लागतो. त्यातच मुंबईत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या असून या वस्त्यांमधील रस्ते चिंचोळे व दाटीवाटीचे आहेत. याकरिता अग्निशमन दलाने आता २४ विभागांसाठी २४ दुचाकी  घेण्याचे ठरवले आहे. त्याकरिता पालिका तीन कोटी १५ लाख रुपये खर्च करणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण अशा दुचाकीवर दोन पाण्याच्या टाक्या असणार आहेत. या दुचाकींची बांधणी व पुरवठा तसेच पाच वर्षांची देखभाल असा खर्च या कंत्राटात समाविष्ट आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या सहा अग्निशमन केंद्रांच्या आधिपत्याखाली ३५ अग्निशमन केंद्रे व १८ छोटी अग्निशमन केंद्रे व २५८ पेक्षा अधिक वाहनांचा ताफा आहे.

१३ वेळा मुदतवाढ

अग्निशमन दलाकरिता वैशिष्ट्यपूर्ण दुचाकी खरेदी करण्याकरिता ज्या निविदा मागवण्यात आल्या होत्या, त्याला आतापर्यंत १३ वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. जानेवारी २०१८ मध्ये पहिल्यांदा निविदा मागवण्यात आल्या होत्या. दोनदा मुदतवाढ देऊनही एकच निविदा प्राप्त झाली होती. मात्र तेव्हा स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये पुनर्निविदा मागवण्यात आली. अपुरा प्रतिसाद व करोना प्रादुर्भावामुळे भारत सरकारच्या रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्रालयाची मंजुरी मिळण्यास उशीर झाल्याने निविदेस तब्बल १३ वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.