मुंबई: मालाडच्या पठाणवाडीतील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी २५ बांधकामे हटवली ;एकूण १५२ बांधकामे हटवणार | 25 constructions obstructing road widening in Malad Pathanwadi were removed mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई: मालाडच्या पठाणवाडीतील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी २५ बांधकामे हटवली ;एकूण १५२ बांधकामे हटवणार

पश्चिम उपनगरातील मालाडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पठाणवाडी येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

bmc
(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम उपनगरातील मालाडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पठाणवाडी येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रुंदीकरणात अडथळा ठरणारी १५२ बांधकामे हटविण्याची कार्यवाही पी-उत्तर विभाग कार्यालयाने हाती घेतली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी एकूण २५ बांधकामे हटविण्यात आली असून गुरुवारीही कारवाई सुरू राहणार आहे.

हेही वाचा >>>मुंबईच्या अनेक भागात ४८ तास पाण्याविना, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक विभागात पाणी पुरवठा झालाच नाही

पश्चिम उपनगरांतील सर्वात जास्त लोकसंख्येचा भाग असलेल्या मालाड परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमच भेडसावत असतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या ‘पी उत्तर’ विभाग कार्यालयाने वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पठाणवाडीतील रस्ता १८.३० मीटर रुंद करण्यात येणार असून या रुंदीकरण रेषेत सुमारे १५२ बांधकामे अडथळा ठरत आहेत. ही सर्व बांधकामे प्रशासकीय प्रक्रियेनुसार हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या १५२ पैकी ८१ बांधकामे नियमानुसार योग्य त्या मोबदल्यासाठी पात्र ठरली आहेत.

हेही वाचा >>>वसई-विरारची तहान मार्चपासून भागणार, सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार

उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी ही कार्यवाही सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी सुमारे २५ बांधकामे हटविण्यात आली. त्यासाठी तीन जेसीबी संयंत्र, दोन डंपर, ३० कामगार आणि आठ अभियंते प्रत्यक्ष कार्यवाहीच्या ठिकाणी कार्यरत होते. गुरुवारीही कार्यवाही सुरू राहणार असल्याची माहिती ‘पी-उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.दरम्यान, पात्रताधारकांना मोबदला मिळाल्यानंतर संबंधित बांधकामे तातडीने हटविली जातील. त्यानंतर महानगरपालिकेच्या रस्ते विभागामार्फत सदर रस्त्याचे रुंदीकरण व विकास कामे हाती घेण्यात येतील, असेही दिघावकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 17:14 IST
Next Story
नायर रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी केला मानवी शरीरावर थेट सराव, सरकारी रुग्णालयामध्ये प्रथमच अशी सुविधा